ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

भाजप अजितदादांची साथ सोडणार? 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर आता भाजप, संघात महत्त्वाच्या घडामोडी सुरु

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काय फायदा झाला, अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझरनं’नं लोकसभेतील खराब कामगिरीनंतर राष्ट्रवादीसोबत भाजपनं आघाडीच्या करण्याच्या निर्णयावर टीका केली. यानंतर आता भाजप-राष्ट्रवादीच्या काडीमोडाची चर्चा जोर धरु लागली आहे.
भाजप राष्ट्रवादीसोबतची युती तोडून विधानसभेची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पाडून अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्याचा भाजपचा निर्णय संघाला पटलेला नाही. ‘भाजप, संघाच्या केडरची भूमिका पवारविरोधी राहिली आहे. सिंचन आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी पवारांचा संबंध असल्यानं संघ, भाजप पवारविरोधी आहे. पण अजित पवारांसोबत युती करताना विचारधारेलाच तिलांजली देण्यात आली. याशिवाय अजित पवारांना उपमुख्यमंत्री करुन त्यावर मीठ चोळण्यात आलं,’ असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दादांमुळे भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का
‘लोकसभा निवडणुकीत भाजप-संघाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास तयार नव्हते हे स्पष्टपणे दिसलं. बऱ्याच ठिकाणी ते निष्क्रिय राहिले. कार्यकर्ते भाजपवरही नाराज होते. त्याचा परिणाम निकालाल दिसला. भाजप २३ जागांवरुन ९ वर घसरला,’ असं भाजप नेत्यानं सांगितलं. संघात हृयात घालवलेले स्वयंसेवक रतन शारदा यांनी ऑर्गनायझरमधील त्यांच्या लेखात अजित पवारांमुळे भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
युती तोडण्यात अडचण काय?
अजित पवारांसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात भाजपची एक अडचण आहे. ‘अजित पवारांची साथ सोडून शिंदेसेनेसोबत विधानसभेची निवडणूक लढवल्यास भाजपनं अजित पवारांचा वापर करुन घेतल्याचा मेसेज जातो. भाजप वापरुन फेकून देतो असा संदेश गेल्यास ते महागात पडू शकतं. पण अजित पवारांना सोबत ठेवल्यास ते ओझं ठरु शकतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून अजित पवार महायुतीच्या उपयोगाचे नसल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे भाजपला राष्ट्रवादीचं काय करायचं याचा विचार करावा लागेल,’ असं अन्य एका नेत्यानं म्हटलं.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button