breaking-newsमहाराष्ट्र

जनता जागीच आहे, 2019 मध्ये सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील – उद्धव ठाकरे

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. या बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला असून शिवसेना मात्र बंदमध्ये सहभागी झालेली नाही. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये असं म्हटलं आहे.

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

महागाईचे चटके जनता रोज सोसत आहे. हे आता फक्त चटके राहिले नसून जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघाली आहे. सरणावरील चिता पेटवण्यासाठी जशी आग लागते तशीच ही आग असून जनतेला जाळून मारण्यासाठीच ही महागाईची आग लावली आहे. त्यामुळे या आगीने होरपळलेली जनता जागी नाही व तिला जागे करावे यासाठी हा ‘बंद’ आहे हे तत्त्वज्ञान पटणारे नाही. जनता जागीच आहे. ती 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मोदींचे सरकार सर्वच आघाड्यांवर ‘फेल’ असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. इतर आम्हाला काही माहीत नाही, पण महागाईने जनतेला नागडे केले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरी पार करतील. हे चित्र भयंकर आहे. महाराष्ट्राच्या परभणीत पेट्रोलचा भाव सर्वाधिक 90 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत 88 रुपये आहे. म्हणजे पेट्रोल लवकरच शंभरी गाठणार हे निश्चित आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅसही महागला. डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले की वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे धान्य, भाज्या, दूध, प्रवास अशा सर्वच गोष्टी सध्या महाग झाल्या आहेत. या परिस्थितीत जनतेने जगायचे कसे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, एक दिवस भाजपचे नेते होऊन दाखवा. मग सरकार चालवणे किती अवघड आहे ते कळेल. आमचे पाटलांना सांगणे आहे, सरकार व भाजपकडे चारही बाजूने पैसाच पैसा येत आहे व त्यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही सांगतो, भाजप नेते होणे सोपे आहे. एक दिवस होरपळीत सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवन जगून दाखवा. ते शक्य आहे काय? सामान्य माणसाच्या नशिबी सध्या प्रवासातही खड्डा आणि पोटातही खड्डाच आला आहे असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षाने ‘बंद’ पुकारला म्हणून त्यांच्या नावाने बोटे का मोडता? सरकारला शेतकर्‍यांचे संकट दूर करता आले नाही. 2014 मध्ये मोदी यांनी आश्वासन दिले होते की, देशात दोन कोटी नोकर्‍या दरवर्षी तरुणांना मिळतील, पण उलटेच झाले. प्रतिवर्षी 20 लाख नोकर्‍या कमी झाल्या आहेत. तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नाही. इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे सरकारी फलकही लावा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

राहुल गांधी हे मांसाहार करतात म्हणून टीका करणार्‍यांनी वाढणार्‍या महागाईवर बोलायला हवे. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 2019 ला विरोधी पक्षात बसल्यावर नवा ‘बंद’ पुकारून ते महागाईवर बोलणार आहेत काय? महागाईचा प्रश्न जनतेच्या जीवन-मरणाचा आहे हे ज्यांना समजले तोच राज्यकर्ता. देशातील 22 राज्यांत भाजपची सरकारे आहेत. भाजपने मनात आणले तर पेट्रोल-डिझेलचे भाव ते नक्कीच खाली आणू शकतील, पण केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या व्यापारातून तब्बल सुमारे दोन लाख 29 हजार कोटी इतका नफा कमवला. हे जनतेचे रक्त शोषून मिळवलेले पैसे आहेत. हे शोषण कसे थांबवणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button