breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

कोकणात सर्वात मोठा धक्का, आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत

रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्याचे परिणाम कोकणातही दिसायला लागलेत. कोकणातून केवळ ३ आमदार ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेत. बाकी सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना सध्या राज्यभरातून १५ सेना आमदारांचं पाठबळ आहे. त्यातही ३ आमदार कोकणातील आहे. भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक तिघेही ‘मातोश्री’च्या जवळचे आहेत. मात्र हाती आलेल्या बातमीनुसार, याच तीनपैकी एक आमदार ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. येत्या ४८ तासांत ‘तो’ आमदार शिंदे गटात दाखल होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. याच मुद्दयावरून कोकणातील आणखी एक विद्यमान शिवसेनेचा ज्येष्ठ आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आता जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास उद्धव ठाकरे यांना कोकणात सर्वांत मोठा धक्का बसणार आहे.

आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या माणसाची उद्धव ठाकरे गटातील कोकणातील शिवसेना आमदाराने भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरचे आमदार भास्कर जाधव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक आणि राजापूरचे आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे ही भेट कोणत्या आमदाराने घेतली? कोणत्या कारणासाठी घेतली याबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं. तसेच कोकणात उद्योग आल्यास येथील बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल, रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आपण या रिफायनरी बाबत ज्यांचे गैरसमज असतील ते दूर करू अशी भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी आमदार राजन साळवी यांचीही आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करू असे जाहीरपणे सांगितले होते. अर्थात ही भेट रिफायनरीच्या मुद्यावर होणार आहे पण ही भेट झाल्यास या दोन नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा होईल, अशी शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे सगळ्यात जवळचे साथी किंबहुना त्यांच्या आजारकाळात सगळा पक्ष ज्यांच्या हाती सोपवला होता त्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन पक्षनेतृत्वाविरोधी भूमिका घेऊन भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेतली. त्यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील मविआ सरकार कोसळलं. यानंतर राज्यात लगोलग शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापनेनंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे गटात जाण्याचा ओढा वाढला. ठाकरे गटातील एकेएक पदाधिकारी शिंदे गटात एन्ट्री करतो आहे. आता कोकणातील आणखी एका सेना आमदाराने ठाकरेंची साथ सोडली, तर तो त्यांच्यासाठी फार मोठा धक्का असेल.

शिंदे गट

उदय सामंत (रत्नागिरी)
योगेश कदम (दापोली)
दीपक केसरकर (सावंतवाडी)
महेंद्र दळवी (अलिबाग)
महेंद्र थोरवे (पनवेल)
भरत गोगावले (महाड)

ठाकरे गट

राजन साळवी (राजापूर)
भास्कर जाधव (गुहागर)
वैभव नाईक (मालवण)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button