TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

मोठी बातमी: मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला

पुणे: मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नोटिसा बजावल्यानंतरही ज्या मिळकतधारकांकडून मिळकत कर भरण्यात येत नाही, अशा मिळकतींचे नळजोड तोडणे; तसेच त्यांच्या मिळकतींच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेची ही कारवाई ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

पुणे महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या चार लाख ७४ हजार ९३८; तसेच व्यावसायिक असलेल्या ६७ हजार ५४८ मिळकतींकडे मिळकतकराची थकबाकी आहे. थकबाकीची ही रक्कम सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये मोबाइल टॉवर; तसेच मिळकतांना दुबार करआकारणी झाल्याचे प्रकारही आहेत. असे असले तरी, मिळकतकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून, ती वसूल करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी शुक्रवारी त्यांच्या अखत्यारीतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये थकबाकी वसुलीसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झडली.

महापालिकेने मिळकतकराच्या वसुलीसाठी गेल्या वर्षी अभय योजना राबवली आहे. अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांकडून पुन्हा थकबाकी करण्यात येत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. महापालिकेकडून या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांवर ठोस कारवाई करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव करणे, अशा मिळकतींचे नळजोड कापणे आणि थकीत मिळकतींच्या सातबाऱ्यावर महापालिकेचा बोजा चढविणे. ही कारवाई तीव्र झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते; अन्यथा थकबाकीदारांची संख्या दर वर्षी वाढणार असल्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या आहेत उपाययोजना

– विभागीय निरीक्षकांनी दररोज पाच थकबाकी असलेल्या मिळकती सील करणे.

– थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करणे.

– ऑक्टोबर महिन्यापासून प्लंबरच्या मदतीने थकबाकीदारांच्या मिळकतींचे नळजोड कापण्यात येणार आहे.

– थकबाकीदार मिळकतींच्या सातबाऱ्यावर बोजा चढविणे.

– समाविष्ट गावांमध्ये बिगर निवासी मिळकतींच्या मिळकतकराची वसुली मोहीम राबविणे.

मालमत्ताकराची सद्यस्थिती

गेल्या वर्षी १२ ऑगस्टपर्यंत जमा झालेला मिळकतकर – ९८२ कोटी २३ लाख रुपये

या वर्षी १२ ऑगस्टपर्यंत जमा झालेला मिळकतकर – ११५४ कोटी पाच लाख रुपये

गेल्या वर्षी एकूण मिळकत कर जमा – १८५२ कोटी रुपये

निवासी थकबाकीदार मिळकती – चार लाख ७४ हजार ९३८

बिगर निवासी थकबाकीदार मिळकती – ६७ हजार ५४८

एक कोटी रुपयांपेक्षा कमी थकबाकी (रुपयांमध्ये) (२०२१ सालच्या अखेरची)

थकबाकीदार -मिळकती – संख्या – मूळ रक्कम – दंडासह एकूण रक्कम

निवासी ३,३९,६५९ ८,४०,२५,२५,७४६ २२,१५,६५,८७,४०८

बिगर निवासी ४९,३६४ ३,४५,५४,१६,९८६ ७,३२,९०,८१,४६४

ओपन प्लॉट १९,५२३ १,७६,९६,६०,७६३ ६,६५,४९,१४,५४२

मिक्स १०,३९७ ९२,०४,४८,०८६ २,३९,७९,६८,२४०

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button