breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील मोठी बातमी : ‘या’ नेत्याला मिळू शकते आता विधान परिषदेवर संधी!

स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील ७ जागांवर लक्ष

शहराच्या राजकारणातील ‘बब्बर शेर’ पुन्हा मैदानात

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. शहराच्या राजकारणातील ‘बब्बर शेर’ अशी ओळख असलेले भोसरीचे आमदार विलास लांडे यांना पुढील वर्षी रिक्त होणाऱ्या पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवर संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे, २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील आणखी दोन दिग्गजांना महामंडळावर संधी देत सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यात येईल. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
२०१६ मध्ये विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली होत. त्यावेळी विधान सभा सदस्यांमधून १० आणि स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातून ७ जणांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती.
पुणे स्थानिक प्राधिकरण संस्था मतदार संघातून त्यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून अनिल भोसले यांना अधिकृतपणे उमदेवारी मिळाली होती. लांडे यांनी बंडखोरी केली असती, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसला असता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी लांडे यांची त्यावेळी समजूत काढली. त्यामुळे लांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यावेळी ‘‘माझी निष्ठा शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी आहे’’ अशी गर्जनाही त्यांनी केली होता.
दरम्यान, २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून लांडे यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, पुन्हा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. परिणामी, लांडे समर्थकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लांडे यांना पाठिंबा दर्शवला होता. या निवडणुकीत लांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकांनंतर शिवसेनेने युती तोडली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद तुलनेने भाजपापेक्षा जास्त आहे. मात्र, स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभा करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांना संधी मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लांडे यांचा चांगला जनसंपर्क आणि नाती-गोती…
पिंपरी-चिंचवडसह पुणे, मावळ आणि शिरुरच्या ग्रामीण भागात विलास लांडे यांचा चांगला जनसंपर्क आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांसोबत सलोखा आहे. विशेष म्हणजे, या भागात नाती-गोती असल्यामुळे लांडे यांना मानणारा वर्गही मोठा आहे. गतवेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांनी मदत करण्याचा ‘शब्द’ लांडे यांना दिला होता, असेही बोलले जाते. त्यामुळे विधान परिषदेत लांडे यांना संधी दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण पट्टयात राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
महामंडळावर कुणाला मिळणार संधी?
महापालिका निवडणुकीत स्थानिक आणि बाहेरचा हा मुद्दा भाजपाकडून कायम चर्चेत आणला जातो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून स्थानिक नेतृत्त्वाला ताकद देण्याची रणनिती आखली जाईल. दुसरीकडे, निवडणुकांनंतर शहर राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या पडत्या काळात प्रामाणिक काम करणाऱ्या स्थानिक चेहऱ्याला महामंडळावर संधी देवून नवोदितांना पक्ष संघटनेची धूरा देण्यात येईल.
दुखावलेल्या लांडेंचा सूचक विमान प्रवास
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि माजी आमदार विलास लांडे यांनी (दि.११) रोजी पुणे ते लातूर असा विमान प्रवास केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. गेल्या काही दिवसांपासून ज्यांना मोठे केले. तेच नेते लांडे यांना ‘कॉर्नर’ करीत होते. मात्र, लांडे यांनी अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेतले. आता आगामी काळात लांडे यांना पक्षश्रेष्ठींकडून ताकद देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य पुढीलप्रमाणे :
भाजप
प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते), सदाभाऊ खोत, सुजिर्तंसह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह, चंदुभाई पटेल, परिणय फुके,
शिवसेना
उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी,
राष्ट्रवादी काँग्रेस
संजय दौंड, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अनिल भोसले
काँग्रेस
मोहन कदम, अमर राजूरकर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button