TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई ।

गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्यात घमासान सुरू होते. मात्र, आता भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागेही घेतला.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीवरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाले. ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला. शिवसेनेच्या पक्षनावासह चिन्हाचा वाद मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला. त्यामुळे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर, दोन्ही गटांनी स्वतंत्र नाव आणि चिन्ह सादर केले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास सांगितलं तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देत बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरण्यास सांगितलं.

दरम्यान, भाजपाकडून मुरजी पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं. मुरजी पटेल यांनी प्रचारालाही सुरुवात केली. शिंदे गटाने उमेदवार जाहीर न करता भाजपाला पाठिंबा दिला. तर, राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. म्हणजेच, या निवडणुकीत आता राष्ट्रीय पक्षांकडून दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर अपक्ष व इतर पक्षांचे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली होती. बिनविरोध निवडणुकीची मागणी वाढल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये काल मध्यरात्री बैठक पार पडली. ही निवडणूक व्हावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. परंतु, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला. काहीच वेळापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा माघार घेत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. मुरजी पटेलसह इतर उमेदवारांनीही आज अर्ज मागे घेतल्यास ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून मार्ग मोकळा होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button