TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कागदपत्रांअभावी शवविच्छेदन रखडले ; नंदुरबार बलात्कार-हत्याप्रकरणी दिरंगाई सुरूच

मुंबई : नंदुरबार बलात्कार व हत्या प्रकरणातील महिलेचा मृतदेह तबब्ल दीड महिन्यानंतर पुन्हा विच्छेदनासाठी गुरुवारी मुंबतील जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, या प्रकरणातील  प्रशासनाची दिरंगाई कायम असून, कागदपत्रांअभावी गुरुवारी रात्रीपर्यंत शवविच्छेदनच होऊ शकलेले नाही.

नंदुरबारमधील धडगाव येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी केली होती. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने वडिलांनी दीड महिना मृतदेह मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला होता. ‘लोकसत्ता’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या आणि या प्रकरणात बलात्कार, हत्येचा गुन्हा नोंदवून मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, शवविच्छेदनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत शवविच्छेदन सुरू करता आले नाही, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.  पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ताबडतोड शवविच्छेदन केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष तपास पथक स्थापन करा : डॉ. गोऱ्हे

या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केली. गोऱ्हे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हे प्रकरण माध्यमांनी लावून धरल्याचे नमूद करताना डॉ. गोऱ्हे यांनी ‘लोकसत्ता’चा आवर्जून उल्लेख केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button