breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

इच्छुकांनो होशियार : आगामी महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तात्काळ महापालिका : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपाची मोठी रणनिती

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होवून आता दीड वर्ष झाले. महापालिका सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, असे चित्र हेतुपूर्वक निर्माण केले जात असून, विरोधी पक्षातील इच्छुकांना गाफील ठेवण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची ‘रणनिती’ आखली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ‘होशियार’ रहावे लागणार आहे.

महापालिका निवडणूक २०२४ की २०२५ मध्ये होणार… अशी साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीकडून राज्यात बूथनिहाय, मंडलनिहाय नियोजन सुरू आहे. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातून भाजपा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल आणि त्यांचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होईल. त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होईल, असा सर्व्हे आहे.

भाजपा आणि अन्य त्रयस्थ संस्थांच्या वतीने आतापर्यंत तीन सर्व्हे केले आहेत. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभेच्या पुणे, शिरुर आणि मावळ अशा तीनही जागा महायुतीला मिळतील, असा दावा केला आहे. बारामतीच्या जागेकरिता ‘महायुती’ने ताकद पणाला लावली आहे. तसेच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘‘मे- २०२४ मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बहुमताने विराजमान होतील.’’ असा दावा केला आहे. केंद्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते ज्यापद्धतीने प्रचार कार्यात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे निवडणूक सहा महिन्यांत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, भाजपाचा प्रमुख अजेंडा असलेला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण जानेवारी-२०२४ मध्ये होत आहे. हा भाजपासाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहणार आहे. त्यानंतर लगेचच दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतील. तत्पूर्वीच निवडणुकीची घोषणा करण्यात येईल. परीक्षांचा कालावधी संपला की मार्च- एप्रिल-२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू होवून मतदान होईल. मे- २०२४ मध्ये नवीन पंचवार्षिकसाठी पंतप्रधान शपथ घेतील. देशभरात भाजपाचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच या पोषक वातावरणाचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेतला जाणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुमत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच मे- २०२४ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची रणनिती आहे.

इच्छुकांसाठी अवघा सहा महिन्यांचा कालावधी…

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांसाठी अवघ्या ६ महिन्यांचा कालावधी तयारीकरीता मिळणार आहे. जानेवारीमध्ये राम मंदिराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे प्रचंड ‘ब्रँडिंग’ भाजपा करणार असून, त्याचा फायदा मार्च-एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीत होईल. हा ‘माहोल’ करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत मिळवण्यासाठी भाजपा ‘फिल्डिंग’ लावणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बहुमत ऑक्टोबर- नोव्हेंबर- २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button