breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणलेखसंपादकीय

भूमिका: अजित पवारांचा सत्ताप्रवेश अन्‌ भाजपाचे हतबल कार्यकर्ते! – ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर

राज्यात सत्तांतराचे नाट्य घडवून ‘महाचाणक्य’ झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा आणि संघ परिवारासह महाराष्ट्रातील भाजपा समर्थक मतदारांच्या टीकेचे धनी बनले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन स्थापन केलेले सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची विश्वासार्हता गमावलेली आहे. परिणामी अजित पवारांचा सत्ताप्रवेश आणि भाजपाचे कार्यकर्ते हतबल, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

  • सचिन चपळगावकर, ज्येष्ठ पत्रकार. 

‘‘भट-बामणांचा पक्ष’’ म्हणून ज्यांनी आतापर्यंत भाजपाला हिनवले. त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना बसावे लागेल. हे निष्ठावंत भाजपायींना रुचणारे नाही. भाजपा आणि संघ परिवार भाजपा+राष्ट्रवादी या नव्या तडजोडीला कदापि स्वीकारणार नाही. २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर १०५ आमदार निवडून आले. प्रत्येकाने राष्ट्रवादी-काँग्रेसशी दोन घात केले. संघर्ष केला. पण, त्यानंतरच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या काळात भाजपाच्या आमदारांना मतदार संघातील कामे मार्गी लावताना विरोधी पक्षात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे.

पण, आता भाजपानेच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. गेल्या वर्षभरापासून मंत्री पदाची स्वप्ने पडणाऱ्या शिवसेना आणि भाजप आमदारांचा केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्यनिती’मुळे स्वप्नभंग झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्या-त्या मतदार संघात आव्हाने देणारे भाजपाचे आमदार घायाळ झाले. किंबहुना, भाजपाला मानणारा मतदार आणि कट्टर समर्थकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होवू लागली आहे. मोदी आणि भाजपाची विश्वासाहर्ता फडणवीसांच्या सुडाच्या राजकारणामुळे धोक्यात आली असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कामगिरीवर दुष्परिणाम होणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता…

पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक राजकारणाचा विचार करता मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) श्रीरंग बारणे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी विरुद्ध बारणे हा संघर्ष राज्यभरात चर्चेत होता. चिंचवड विधानसभा मतदार संघात स्व. आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांनीही बलाढ्य राष्ट्रवादीशी दोनहात केले आणि भाजपाच्या सत्तेचे शिलेदार बनले. मावळ विधानसभा मतदार संघात माजी मंत्री बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याशी संघर्ष केला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत झाली. काटे आणि कलाटे दोघांनी भाजपाला आव्हान दिले. आता आगामी काळात शहरातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अशा तीनही प्रमुख पक्षांच्या विरोधकांना एकाच व्यासपीठावर बसावे लागणार आहे. अजित पवार यांच्या भाजपासोबतच्या युतीमुळे आतापर्यंत राष्ट्रवादीसोबत संघर्ष केलेल्या खासदार श्रीरंग बारणे आणि महेश लांडगे यांचीही राजकीय कोंडी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button