breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

अजित गव्हाणेंचा पायगूण : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत येईल काय?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे २०१४ पासून राष्ट्रवादीला लागलेली अधोगती आता गव्हाणेंच्या नियुक्तींने थांबणार काय? किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून १० जून १९९९ रोजी झाली. तेव्हासून २०१७ पर्यंत माजी महापौर स्व. मधुकर पवळे यांच्यापासून शकुंतला धराडे यांच्यापर्यंत एकूण ९ वेळा महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. विशेष म्हणजे, सुमारे २० वर्षे राष्ट्रवादीची सत्ता गाजवली आहे. तत्पूर्वी, १३ वर्षे काँग्रेसचे सत्ता राखली असून, १४ महापौरांना संधी दिली. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार करता सुमारे २७ वर्षे भाजपेतर विचारांच्या पक्षाकडे महापालिकेची एकहाती सत्ता राहिली आहे.
काँग्रेसचे पानिपत करुन राष्ट्रवादीने शहरावर सत्ता मिळवली. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपाला सुगीचे दिवस आले. तत्पूर्वी, २०१४ मध्ये राज्यात भाजपाकडे सत्ता गेली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पहिला हादरा बसला. दिगग्ज नेते लक्ष्मण जगताप भाजपात दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला पहिला धक्का बसला. त्यानंतर आमदार महेश लांडगे अपक्ष निवडून आले. त्यांनी भाजपाला पहिल्यांदा पाठिंबा दिला. २०१७च्या निवडणुकीपूर्वी भाजपात अधिकृत प्रवेश करुन राष्ट्रवादीला सुरूंग लावला.
२०१४ पासून राष्ट्रवादीला लागलेली पराभवाची मालिका आता नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना थांबवायची आहे. दोन-तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित गव्हाणे यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच शहराध्यक्षाची घोषणा शहरातच का?
वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षाची घोषणा मुंबईतील पक्षकार्यालयात किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित होणे अपेक्षीत होते. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांची घोषणा पत्रकार परिषद घेवून शहरात घ्यावी लागली. या प्रेसला प्रदेश संघटनेतील एकाही पदाधिकाऱ्याची उपस्थिती दिसली नाही. विशेष म्हणजे, शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडेही या प्रेसला फिरकले नाहीत. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल यांनी घोषणेचा कार्यक्रम उरकला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही सोशल मीडिया हॅडवरुन साधी अभिनंदनाची पोस्टही पहायला मिळाली नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा निर्णय झाला, पण पक्षश्रेष्ठींकडून त्याचा उत्सव साजरा झालेला पहायला मिळाला नाही.
माजी महापौर योगेश बहल राष्ट्रवादीचे ‘संकटमोचन’
राष्ट्रवादीच्या शहर संघटनेतील बदलात माजी महापौर योगेश बहल यांचा रोल महत्त्वपूर्ण राहिला आहे, असे सांगितले जाते. शनिवारी गव्हाणे यांच्या निवडीची घोषणा केली. त्यावेळी बहल यांचा व्यासपीठावरील वावर आणि आत्मविश्वास पाहता बहलांच्या नेतृत्वाखाली नवी फळी काम करणार हे निश्चित मानले जाते. विशेष म्हणजे, शहराध्यक्षपदाची घोषणा होताच काही तासांत योगेश बहल यांची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रभारी आणि मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गव्हाणे यांच्या रथाचे सारथी बहल असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गव्हाणे-बहल जोडी आगामी महापालिका निवडणुकीत ‘राम-लक्ष्मण’च्या जोडीला आव्हान देईल का? आणि अजित गव्हाणे यांच्या पायगुणाने राष्ट्रवादीची पराभवाची मालिका थांबतेय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
… तोपर्यंत अजित गव्हाणे तग धरतील काय?
आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व अजित गव्हाणे करणार आहेत. त्यासाठी गव्हाणे यांना २०२२ मध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी आणि अंतर्गत गट-तटाचे राजकारण थांबवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी स्वत: गव्हाणे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा थेट सामना करावा लागेल. त्याचवेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक रवि लांडगे हेसुद्धा प्रमुख इच्छुक आहेत. भोसरी मतदार संघातील विधानसभा निवडणुकीत गव्हाणे यांचा कस लागणार आहे. तत्पूर्वी, महापालिका निवडणुकीत भोसरीतून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आणि इच्छुक उमेदवार नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्यात समझोता करावा लागणार आहे. तसेच, भाजपातील नाराज नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याने पिंपरीच्या मैदानात तीन प्रभावी उमेदवारांना तोंड द्यावे लगणार आहे. चिंचवड मतदार संघात आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून तिकिटासाठी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे आदी इच्छुक आहेत. यात तोडगा काढण्यासाठीही गव्हाणे यांची कसोटी लागणार आहे. कारण, राष्ट्रवादीचे कारभारी असलेले अजित पवार यांना आता राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे. उमेदवारी, तिकीट वाटप या बाबी हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना हक्काचा माणूस हवा आहे. त्यादृष्टीने गव्हाणे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, असे सांगितले जाते.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्ये शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळमधून युवा नेते पार्थ पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल. त्यावेळी स्थानिक पातळीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांच्याशी दोन हात करीत कौल्हेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरवे लागणार आहे. मावळात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याशीही दोनहात करावे लागतील, असे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक-बाहेरचा, विद्यमान आणि आजी-माजी, इच्छूक आणि संभाव्य इच्छुक अशा संघर्षातून अजित गव्हाणे यांना राष्ट्रवादीचे जहाज सुरक्षित किणाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता ठेवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button