आरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19 : महाराष्ट्रात करोनाच्या ४००५ मृत्यूंची भर, फेरआढाव्यात माहिती आली समोर

नवी दिल्ली | Online Team 

करोनाच्या साथीमध्ये महाराष्ट्रात मृत्यू लपवले जात असल्याचे प्रकरण उजेडात आणून मृत्युसंख्येचा फेरआढावा घेण्यास भाग पाडले होते. आता करोनासाथीला उतार आला असताना, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मृत्यूच्या संख्येचा आढावा घेण्यात आला असून, त्यात ४,००५ मृत्यूंची नव्याने नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत देशात ४,१०० नव्या करोनामृत्यूंची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार करोना पॉझिटिव्ह असलेल्या, मात्र इतर आजारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद न करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याने आधी इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद करोनामृत्यूमध्ये करण्यात आल्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्रातील करोनामृत्यूंची संख्या वाढली. देश आणि महाराष्ट्राच्या एकूण करोनामृत्यूंमध्ये ४००५ मृत्यू नव्याने जोडण्यात आले. त्यामुळे २४ तासांतील करोनामृत्यूंची संख्याही ४,१००वर पोहोचली. करोनामृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने धोरण निश्चित केले असून, त्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या, मात्र इतर आजारांनी मृत्यू झालेल्यांची नोंद करोनामृतांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले होते.

राज्य सरकारने या नव्या नियमानुसार करोनामृत्यूंची मोजदाद करण्यास सुरुवात केली असून, त्यात ४००५ मृत्यूंची नव्याने करोनामृत्यू म्हणून नोंद झाली. तर अन्य दोन करोनाबाधितांचाही मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूचा आकडा एक लाख ४७ हजार ७७९वर पोहोचला आहे. २४ मार्चपर्यंत मुंबईमध्ये १६ हजार ६९३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, २,८६४ मृत्यू हे करोना पॉझिटिव्ह असलेले पण इतर कारणांनी झाले आहेत, अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली. मात्र, आता करोनामृतांचा आकडा १९ हजार ५५८वर पोहोचला असून, त्यात शुक्रवारच्या एका मृत्यूचाही समावेश आहे. ठाण्यात करोनामुळे ११ हजार ८७० जणांचा मृत्यू झाला होता. आता त्यात करोना पॉझिटिव्ह असून, इतर व्याधींमुळे झालेल्या मृत्यूंची जोडणी करण्यात आल्यानंतर हा आकडा ११,९०५वर पोहोचला आहे.

देशात १,६६० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण बाधितांचा आकडा चार कोटी ३९ लाख १८ हजार ३२वर पोहोचला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संध्या २० हजारांखाली आली आहे. सध्या १६ हजार ७४२ बाधित उपचार घेत असून ही संख्या ७०२ दिवसांतील नीचांकी आहे. ४,१०० एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राच्या ४,००७, तर केरळच्या ८१ बळींची नोंद आहे.

कोविड पॉझिटीव्ह असताना, इतर आजाराने वा कारणाने मृत्यू झाला असल्यास पूर्वी त्याची नोंद करोनामुळे मृत्यू अशी होत नव्हती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही नोंद करोनामृत्यू अशी करण्यात आली आहे. त्या निर्देशानुसार आता ४,००५ मृत्यूंचा समावेश करोनामृत्यूमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या मृतांच्या वारसांनाही सानुग्रह अनुदान मिळण्यास मदत होईल.

– डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

करोनाच्या एकूण मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे सहव्याधी असणाऱ्यांचे आहेत. आमचे आकडे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) आकड्यांशी जुळवले जात आहेत.

– आरोग्य मंत्रालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button