TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी, डीएलएफ, नमन समूहाची निविदा

मुंबई : सुमारे २३ हजार कोटींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी शेवटच्या दिवशी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. अदानी रिअल्टी, ‘डीएलएफ’ (दिल्ली लॅन्ड अ‍ॅन्ड फायनान्स) आणि नमन समूह या कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, छाननीनंतर पुढील प्रक्रिया डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे धारावीचा विकासक नव्या वर्षांत अंतिम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

राज्य सरकारने ५५७ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसलेल्या धारावीचा पुनर्विकास २००४ मध्ये हाती घेतला. त्यासाठी २००९ मध्ये निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने २०११ मध्ये निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये दुसऱ्यांदा निविदा जारी करण्यात आल्या. मात्र, या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ती प्रक्रियाही रद्द करण्यात आली. २०१८ मध्ये तिसऱ्यांदा जागतिक पातळीवर निविदा काढण्यात आली. या निविदेला अदानी समूह आणि दुबईस्थित सेकिलक समूह या दोन बडय़ा विकासकांनी प्रतिसाद दिला. यापैकी सेकिलक समूहाची निविदा सरस असतानाही रेल्वे भूखंडाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांचा अभिप्राय मागविण्यात आला. महाधिवक्त्यांनी निविदा रद्द करण्याची शिफारस केली. ही शिफारस महाविकास आघाडी सरकारने मान्य करीत ऑक्टोबर २०२० मध्ये ही निविदा रद्द केली. नव्या सरकारने धारावी पुनर्विकासासाठी १ ऑक्टोबर रोजी चौथ्यांदा जागतिक पातळीवर निविदा जारी केली. ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या निविदापूर्व बैठकीत संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरियातील कंपन्यांसह आठ कंपन्यांनी रस दाखविला. त्यामुळे यंदा निविदांसाठी चुरस असेल, असा दावा केला जात होता.

 या निविदेसाठी ३१ ऑक्टोबर ही मुदत अंतिम होती. मात्र, तोपर्यंत एकही निविदा न आल्याने ही मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली. दिवाळीचा सण असल्यामुळे ही मुदत आणखी वाढवावी, अशी निविदाकारांचीच मागणी होती, असे त्यावेळी प्राधिकरणाने स्पष्ट केले. नव्याने वाढविलेली मुदत मंगळवारी (१५ नोव्हेंबर) संपुष्टात आली. या निविदा बुधवारी उघडल्या तेव्हा तीन कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत रस दाखविल्याचे स्पष्ट झाले. या तिन्ही कंपन्यांच्या निविदांची छाननी केली जाईल. ज्या कंपनीची तांत्रिक निविदा पात्र ठरेल त्या कंपनीचीच आर्थिक निविदा उघडली जाणार आहे, असे धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. श्रीनिवास यांनी सांगितले. 

चुरस अशी..

देशातील १५ राज्ये तसेच २४ शहरांमध्ये गेली ७५ वर्षे बांधकाम व्यवसायात असलेली ‘डीएलएफ’सारखी कंपनी धारावीच्या पुनर्विकासासाठी इच्छुक असल्यामुळे या निविदा प्रक्रियेत चुरस निर्माण झाली आहे. या निविदा प्रक्रियेत सहभागी होणारा नमन समूह १९९३ पासून बांधकाम व्यवसायात आहे. या दोन कंपन्यांच्या तुलनेत अदानी रिअल्टी या कंपनीने १२ वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीची तांत्रिक निविदा पात्र ठरते त्यावरच आर्थिक निविदा उघडली जाणार आहे. तिन्ही बडय़ा कंपन्या असल्यामुळे यंदा धारावीचा पुनर्विकास निश्चितच मार्गी लागेल, असा विश्वासही धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button