TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

लेटलतिफ डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर आता होणार कारवाई, प्रशासनाकडून ‘बायोमेट्रिक’ची सक्ती

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि त्यांच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह इतरही महाविद्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक’ची सक्ती होणार आहे. त्यामुळे विलंबाने येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर बुधवारी टाकली गेली असून या लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे.

मेडिकल रुग्णालयात रोज सुमारे २ हजार ५०० ते ३ हजार आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रोज सुमारे एक हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद केली जाते. दोन्ही रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची फौज आणि कोट्यवधींची यंत्रे असल्याने विदर्भाच्या विविध भागासह शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातूनही अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात.

शासनाकडून येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिले जात असतानाही काही डॉक्टर सकाळी ८ वाजता बाह्यरुग्ण सेवेसाठी हजर राहणे अपेक्षित असताना विलंबाने येतात. विलंबाने येणाऱ्यांत कर्मचारीही मागे नाही.दरम्यान, मेडिकल प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या विलंबावर नियंत्रणासाठी बायोमेट्रिक हजेरीचे १६ यंत्र खरेदी केले. हे यंत्र कार्यान्वित झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यावर हजेरीचा सरावही सुरू झाला आहे.या हजेरीनुसार सगळ्या विभाग प्रमुखांवर त्यांच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद ठेवून सातत्याने विलंबाने येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर प्रशासन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणार आहे. बायोमेट्रिक हजेरीच्या धाकामुळेच मेडिकल रुग्णालयासह त्यांच्या अखत्यारित असलेल्या व्यवसायोपचार महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी वेळेवर सेवेवर येणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मेडिकल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याबाबत काॅलेज काऊंसिलच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊन त्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचारी वेळेवर येण्यास मदत होणार असून त्याने रुग्णसेवेचा दर्जाही सुधारण्यास मदत होईल. तर जाणीवपूर्वक विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाईही केली जाईल, असे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button