TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक प्रकार; आईने तक्रार करताच समोर आलं प्रकरण

यवतमाळः वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला असलेल्या डॉक्टरची रॅगिंग करण्यात आल्याची तक्रार त्याच्या आईने केली आहे. रॅगिंगमुळे या डॉक्टरला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडल्याचा दावाही तक्रारीतून करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपातील यांनी चौकशी समिती नेमली आहे.

डॉ. अनमोल प्रदीप भामभानी याचा तृतीय वर्गात असलेल्यांकडून छळ झाल्याची तक्रार त्याची आई जुही भामभानी यांनी मंगळवारी अधिष्ठातांकडे केली. या तक्रारीनुसार, डॉ. ओमकार कवितके, डॉ. अनुप शाह, डॉ. साइलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळुंके, डॉ. पी. बी. अनुषा यांनी डॉ. अनमोल याला त्रास दिला होता. दोन दिवस सतत उभे ठेवले गेले. कामाने थकल्यानंतरही बसण्यासाठी खुर्ची दिली जात नव्हती. सतत उभे राहिल्याने पायाला वेदना होऊ लागल्या. सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडला. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असतानाही डॉ. अनमोल याला घरी पाठविण्यात आले. नंतर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉ. ओमकार हा आपल्या मुलाला खासगी नोकराप्रमाणे वागवित होता, असा आरोपही जुही भामभानी यांनी केला आहे. रॅगिंग करणाऱ्या वरिष्ठ विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.

समितीकडून बयाण नोंदविण्यास सुरुवात
जुही भामभानी यांच्या तक्रारीवरून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपातील यांनी चार विभाग प्रमुखांची समिती नेमली आहे. या समितीने चौकशीला सुरुवात करून अनेकांचे बयाण घेतले. उद्याही चौकशीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. हे सारे सुरू असताना जुही या मुलगा डॉ.अनमोल भामभानी याला घेऊन बाहेर उभ्या होत्या. या समितीवर आपला विश्वास नाही. त्रयस्थ डॉक्टरांची समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विद्यार्थिंनींशीही किळसवाणा प्रकार?
खालच्या वर्गातील दोन विद्यार्थिनींशी वरिष्ठ वर्गातील विद्यार्थिनींनी किळसवाणा प्रकार केला. त्यांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडून त्याचे मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याची रुग्णालय परिसरात बुधवारी चर्चा होती. या विद्यार्थिनी हादरल्या असून रात्रभर तणावात होत्या. सकाळी त्यांनी काही जवळच्या मैत्रिणींना ही बाब सांगितली. अधिष्ठात्यांकडे तक्रारीचा निर्णयही घेतला. पण, काही विद्यार्थिनींनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थांबल्याचेही सांगण्यात येत आहे. अधिष्ठाता डॉ. फुलपातील यांनीही आपल्याकडे याविषयीची तक्रार आली नसल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button