breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

१० ऑगस्टला राजकीय भूकंप? एकनाथ शिंदेंच्या सेंड ऑफची कुजबूज काही थांबेना…

मुंबई: एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. आणि पुढील काळातही राहतील. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या या स्पष्टोक्तीनंतरही पावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळात जमलेल्या आमदारांमधील कुजबूज काही थांबायला तयार नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, येत्या १० तारखेला एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होतील, असे भाकीत केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सविस्तर प्रतिक्रिया देत राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अभिजीत वंजारी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला आणखी हवा दिली आहे. ते मंगळवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अभिजित वंजारी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींचा दाखला देत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगितले. आता तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण कुटुंबासोबत नरेंद्र मोदी यांना भेटायला दिल्लीला गेले होते. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटणे, ही काही चुकीची गोष्ट नाही. अशा भेटीगाठी होत असतात. पण कुटुंबासोबत, मुलासोबत, सुनांसोबत, नातवंडासोबत भेटणं म्हणजे त्यांचा सेंड ऑफ तर नाही आहे, अशी चर्चा विधिमंडळातील सर्व आमदारांमध्ये सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० किंवा ११ ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. त्या निर्णयात कदाचित एकनाथ शिंदे यांना सेंड ऑफ दिला जाईल आणि या राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री बनवलं जाईल, अशी थिअरी अभिजीत वंजारी यांनी मांडली.

कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याविषयी अभिजीत वंजारी यांना विचारणा करण्यात आली. त्याचा प्रतिवाद करताना वंजारी यांनी म्हटले की, राजकारणात खेळी थोड्या सांगितल्या जातात. प्रत्येक दिवशी जे घडणार ते सांगायचे नसते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का? राजकारणात खेळी सांगितल्या जात नाहीत. ज्या दिवशी घडेल, त्यादिवशी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम करु असं बोलतील, असे वंजारी यांनी म्हटले. अभिजीत वंजारी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीही अशाच धाटणीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता १० ऑगस्टला राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
महायुतीमधील कोणीही मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा करु नये. महायुतीमधील जे लोक हा प्रकार करत आहेत, त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की, अशाप्रकारचे संमिश्र संकेत देणे आणि संभ्रम निर्माण करणे बंद करा. यामुळे महायुतीबाबत संभ्रम निर्माण होतो. महायुतीतील नेत्यांच्या मनात अशी कुठलीही गोष्ट नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, हे मी पूर्ण अधिकृतपणे सांगत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button