breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधालाय. सोमय्या यांनी ‘डर्टी १२’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील काही दिवसांपासून अनेकदा वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गोटेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा कुटील डाव भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केला जातोय. मंत्री नवाब मलिक यांनादेखील याच भावनेतून खोटे आरोप लावत ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकवण्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. आज धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये सहभाग झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. भाजपाकडून केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या गैरवापराचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

“आजच्या आंदोलनाने आम्ही विरोधी पक्षाला दाखवून दिले आहे की, मंत्री नवाब मलिक हे या लढाईत एकटे नाही तर त्यांच्यासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे. तसेच केंद्र सरकारच्या दडपशाहीचा आणि हुकूमशाहीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो,” असं म्हणत अनिल गोटे यांनी केंद्रावर निशाणा साधला. किरीट सोमय्या यांच्याबद्दल बोलताना अनिल गोटेंनी, “किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात (कामला) लागलेला दिसतोय, त्याला काहीतरी यादी मिळालीय,” असा टोला लगावला. तसेच “पुढील आठवड्यात भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांविरोधात मी ईडीमध्ये पुरव्यांसकट तक्रार दाखल करणार आहे,” असंही गोटेंनी सांगितलं. ईडी निष्पक्षपणे त्या प्रकरणात कारवाई करावी, अशी मागणी गोटेंनी केलीय.

याशिवाय गोटे यांनी, “भाजपाचे प्रदेश प्रवक्ते असलेल्या अजित चव्हाण यांनी २४ तास आधीच कसे सांगितले की महाविकास आघाडीच्या एका नेत्याला कोठडी होणार आहे?,” असा प्रश्न उपस्थित केला. “यावरून स्पष्ट होते की केंद्र सरकार हा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करीत आहे.” असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला. यावेळी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शाबीर शेठ तसेच माजी आमदार शरद पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक नेते मंडळी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button