देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली
नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आता पुन्हा घसरण होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात ३० हजार २५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९५ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
गेल्या २४ तासांत भारतात ३० हजार २५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९५ कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. तसेच कालच्या दिवसात देशात ४३ हजार ९३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यासह भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३४ लाख ७८ हजार ४१९ वर गेला आहे. त्यापैकी ३ कोटी २७ लाख १५ हजार १०५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४ लाख ४५ हजार १३३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ३ लाख १८ हजार १८१ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ८० कोटी ८५ लाख ६८ हजार १४४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.