TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील नामांकित शाळेवरील बॉम्बहल्ल्याच्या कटाचे प्रकरण

मुंबई : वांद्रे येथील ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्या प्रकरणी आणि जिहादी विचारसरणीचा प्रचार केल्याप्रकरणी कुर्ला येथील एका २८ वर्षीय संगणक अभियंत्याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अनीस अन्सारी असे या दोषसिद्ध आरोपीचे नाव आहे. त्याला माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सायबर दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठीच्या तरतुदींअंतर्गत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अन्सारी याला ऑक्टोबर २०१४ मध्ये अटक केली होती. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने त्याला अटक केली होती.एटीएसच्या आरोपांनुसार, अन्सारी हा अंधेरीतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तेथे त्याने कंपनीच्या संगणकाचा वापर करून बनावट फेसबुक खाते तयार केले आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला. त्याद्वारे जिहादी विचारसरणीचा प्रचार केला आणि इतरांना दहशतवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप त्याच्यावर होते. समाजमाध्यावरून त्याने बॉम्बस्फोटाच्या हल्ल्याच्या योजनेबाबत उमर एलहाज नावाच्या व्यक्तीशी संभाषण केले होते. त्या संभाषणाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती.

अन्सारी याने केलेला गुन्हा समाजासाठी हानीकारक आहे आणि यामुळे देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवू शकते, असे न्यायालयाने त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना नमूद केले. त्याला अटक करण्यात आली तेव्हा अन्सारी हा खूपच तरूण होता. गेल्या आठ वर्षांपासून तो कारागृहात आहे. त्याचे वय आणि त्याने कारागृहात काढलेला वेळ लक्षात घेऊन त्याला शिक्षेत दया दाखवण्याची मागणी अन्सारी याच्या वकिलाने न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button