breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘‘बेडूक फुगला म्हणून बैल होत नसतो’’ : अजित पवार

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका

पिंपरी । प्रतिनिधी 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने महाविकास आघाडीची उमेदवारी नाना काटे यांना जाहीर केली आहे. ही निवडणूक भाजपाविरोधात थेट लढत व्हावी, असे आमचे प्रयत्न होते. मात्र, पक्षश्रेष्ठींची विनंती धुडकावत राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. ‘‘मला सव्‍वा लाख मते आहेत..’’ असा दावा करणाऱ्या अपक्ष उमेदवाराला आता महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. ‘‘बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नसतो..’’ अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 

महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारानिमित्त वाल्हेकरवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले की, पोटनिवडणुकीसाठी काहीजण उमेदवारी मागत होते. शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. सकाळी साडेनऊ पर्यंत बोलणे चालू होते. ठाकरेंची परवानगी घेऊन नाना काटे यांचं नाव फायनल केलं. त्यानंतर जयंत पाटलांनी ट्वीट करीत उमेदवारी जाहीर केली. अपक्ष उमेदवाराचा फॉर्म राहु नये म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. स्ट्रेट फाईट होऊ द्या, जशी कसब्यात होत आहे. यासाठी प्रयत्न सुरु होता. खूप प्रयत्न करून देखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

गत निवडणुकीत ‘ मला एक लाखापेक्षा अधिक मते पडली ‘, अशी त्यांची समज होती. परंतु ती शिवसेनेची, आघाडीची मते होती. मी चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नव्हता. आम्ही अपक्षाला पाठींबा दिला होता. पिंपरी आणि भोसरीत उमेदवार दिला होता. पण ” बेडूक जेव्हा फुगतं, तेव्हा बेडकाला वाटतं, मीच फुगतोय; परंतु, फुगलेलंपण काय कामाचं नसतं; त्यामुळे त्याचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी दिसतोय”. कोणीतरी नंतर त्याला सांगितलं ‘ तू फॉर्म ठेव. निवडणूक सोपी जाईल’. काहीजण म्हणतात ” आम्हीच त्यांना फॉर्म ठेवायला सांगितला. दुरान्वयेदेखील याचा सबंध नाही. आम्ही शेवट पर्यत त्याला फ्रॉम मागे घ्यायला सांगितला होता. आता त्यालाही कळू द्या त्याच्यामागे किती मतं आहेत ते..’’ असा घणाघातही अजित पवार यांनी केला. 

मराठवाड्यातील निवडणुकीचा दिला दाखला…

‘‘ मराठवाड्यात शिक्षक संघाची निवडणूक होती. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली. आम्ही साहेबांनी ठरवून उमेदवार फायनल केला. मात्र, राष्ट्रवादीच्या पठ्ठ्याने बंड केलं. त्याला समजवून सांगण्याचं काम केलं. शेवटी लोकांनी सांगितलं ‘दादा त्याला पाचेशच मतं पडतील’. तो तर आपला वक्ता होता, अशी माझी समज होती. परंतु, निवडणुकीत त्याला फक्त चारशेवर मतं पडली. कधी आम्हालाही वाटतं आम्ही लयं मोठ झालो. आपल्याला वाटतं आपल्यामागे जनता आहे. परंतु, त्या उमेदवाराच्या मागे पक्ष ,संघटना, नेते आणि त्याचे वलयदेखील असते. म्हणून ते तिथे निवडून येत असतात. परंतु काहीजन हे विसरून जातात.” असा दाखलाही अजित पवार यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button