मद्याच्या नशेत ‘स्कॉर्पियो’ थेट रेल्वे रुळावर, मालगाडीने दिली धडक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Accident-1.jpg)
मुंबई – एका मद्यधुंद स्कॉर्पियो चालकाने बंद रेल्वेगेट तोडून थेट रेल्वे रुळावर प्रवेश केला. त्यावेळी समोरून येणा-या मालगाडीनं धडक दिली. यात मोटारीचं मोठं नुकसान झालं आहे. तर, चालक सुदैवाने बजावला आहे.
डोंबिवलीच्या मोठागाव रेल्वे फाटकात ही घटना घडली. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी चालवत असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत मोठागाव फाटकाजवळ आला. मात्र, फाटक बंद असल्यानं त्यानं फाटकाला धडक दिली, आणि फाटक तोडून गाडी रेल्वे रुळावर गेली. त्याचवेळी या मार्गावरून एक भरधाव मालगाडी आली आणि तिने स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली.
या धडकेत गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं चालकाला जास्त इजा झालेली नाही. त्याच्यावर सध्या डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाविरोधात कारवाई करण्यासाठी यंत्रणा मार्गाला लावली आहे.