Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची हॉटेलांवर मोठी कारवाई; १० परवाने निलंबित

८ व्यावसायिकांना व्यवसाय बंदच्या नोटिसा; अस्वच्छता, अन्नसाठवणुकीतील त्रुटी आणि विनापरवाना व्यवसाय उघड

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत १० हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर आठ व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

घाटकोपर पश्चिम येथील आयान्स दरबार चायनीज रेस्टॉरंटमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. गोवंडीतील अल अशरफ हॉटेलमध्ये दुधाचे पदार्थ उघड्यावर ठेवणे, अस्वच्छ भांडी आणि प्रयोगशाळा तपासणीचा अभाव आढळला. स्टार चायनीजमध्ये कच्चे चिकन जमिनीवर ठेवणे, वापरलेले तेल आणि स्वच्छतेविषयी गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

घाटकोपरमधील खंडेलवाल अँड सन्स आणि महाराष्ट्र ज्यूस अँड स्नॅक्स सेंटरवरही कारवाई करण्यात आली. ज्यूस सेंटरमध्ये औद्योगिक दर्जाचे फ्लेवर इसेन्स आणि रंग वापरले जात असल्याचे आढळल्याने संबंधित पदार्थ जागीच नष्ट करण्यात आले.

हेही वाचा –  ‘ऑपरेशन ३.०’ची चर्चा मंत्री उदय सामंत यांनी फेटाळली

साकीनाका येथील झेप्टोच्या डार्क स्टोअरमध्ये अन्नसाठ्याजवळ जिवंत झुरळ आढळले. मुदतबाह्य तसेच खराब पॅकिंगमधील पदार्थ विक्रीयोग्य साठ्यात ठेवण्यात आले होते. शीतगृहाचे तापमान योग्य राखले जात नव्हते. तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसह अन्नेतर वस्तू एकत्र साठवल्याने दूषितीकरणाचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून या स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आला.

साकीनाका येथील झायका बिर्याणी आणि स्पाइस एन आईस हॉटेलमधील स्वच्छतेच्या त्रुटींमुळे त्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले. कांजूरमार्ग येथील रॉयल पंजाब रेस्टॉरंट अँड बारवरदेखील कारवाई करण्यात आली. गोरेगाव पूर्व येथील डी. एस. फूडचा स्वीट मावा नमुना प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित ठरला. या नमुन्यात ब्यूटिरो रिफ्रॅक्टोमीटर रीडिंग ४६.५९ आढळले, तर निर्धारित मानक ४० ते ४४ आहे. त्यामुळे संबंधित नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.

दरम्यान, चांदिवलीतील बूमरँग इमारतीमधील सहा व्यावसायिकांसह चेंबूर पूर्व आणि साकीनाका परिसरातील आणखी दोन व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळले. या आठ व्यावसायिकांना तातडीने व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group