राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर; दोन G20 छायाचित्रांतून मोदी सरकारची बाजू मांडली!
‘२०१४ पूर्वीचा भारत’ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ अशी तुलना; सत्तेच्या भुकेपोटी देशाची बदनामी करू नका, असा राहुल गांधींना इशारा

मुंबई : भारताच्या परराष्ट्र धोरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारत आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील आपली भूमिका गमावत असून, आता तो एक बाजूचा खेळाडू बनला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी २०१४ पूर्वीचा आणि २०१४ नंतरचा भारत यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन G20 परिषदांमधील छायाचित्रे शेअर केली.
दोन G20 छायाचित्रांची तुलना करत राहुल गांधींवर निशाणा
रविंद्र चव्हाण यांनी २०११ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मागील रांगेत उभे असल्याचे छायाचित्र शेअर केले. त्यासोबत २०२४ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी असल्याचे छायाचित्रही पोस्ट केले.
या दोन्ही छायाचित्रांना ‘२०१४ पूर्वीचा भारत’ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ अशी शीर्षके देत चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या जागतिक प्रतिमेत बदल झाल्याचा दावा केला. ‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा – IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पुण्यातील महिला डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक!
‘सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका’
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना रविंद्र चव्हाण यांनी सत्तेच्या भुकेपुढे त्यांची अवस्था बदलली असल्याचा टोला लगावला. भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासे होते. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही अशीच अवस्था झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
तसेच, या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर सावध राहा; कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र धोरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना रविंद्र चव्हाण यांनी छायाचित्रांच्या तुलनेतून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, केवळ छायाचित्रांवरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान ठरवता येत नसल्याने या मुद्द्यावर राजकीय चर्चेला आणखी धार येण्याची शक्यता आहे.




