करसवलतीचा लाभ कर्मचाऱ्यांनाही दिला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगजगताला सवाल
आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीचा उल्लेख; कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का आणि नव्या रोजगारांची निर्मिती केली का, असा विचारला प्रश्न

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलेल्या सवलतींचा लाभ केवळ उद्योगांपुरता मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (FICCI) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी उद्योजकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. सरकारने करांमध्ये दिलासा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? तसेच नव्या रोजगारांची निर्मिती केली का? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदींनी उद्योगजगताला काय विचारले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2014 मध्ये कॉर्पोरेट टॅक्सचा मूलभूत दर 30 टक्के होता. केंद्र सरकारने तो कमी करून 22 टक्क्यांवर आणला. तसेच 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकराचा भार कमी करणाऱ्या तरतुदींचाही त्यांनी उल्लेख केला.
सरकारने करदात्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतले; मात्र त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना कितपत मिळाला, याचा विचार उद्योगजगताने करायला हवा, असे मोदी म्हणाले. करसवलतीनंतर कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले का, कामगारांची संख्या वाढवली का आणि नव्या लोकांना रोजगार दिला का, असे प्रश्न त्यांनी उद्योजकांना विचारले.
सरकारने निर्णय घ्यावेत आणि उद्योगजगताने त्यानुसार प्रतिसाद देण्याची वाट पाहावी, एवढ्यापुरतेच हे नाते मर्यादित राहू नये. उद्योगांनीही रोजगारनिर्मिती आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश मोदी यांनी दिला.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक विकासकामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या कामांना सरकारचे प्राधान्य
आयकरात दिलासा देण्याचे धाडस दाखवले : मोदी
आयकरात मोठा दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे नागरिकांची खरेदी करण्याची क्षमता वाढण्यास मदत झाली, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. करसवलतींचा अर्थव्यवस्थेला आणि उद्योगांना फायदा व्हावा, यासाठी उद्योग क्षेत्रानेही सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मोदी यांनी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची आणि परतावा (Refund) मिळण्याची प्रक्रिया सुलभ केल्याचाही उल्लेख केला. करदात्यांचा पैसा विनाकारण अडकून राहू नये, यासाठी केंद्र सरकारने करप्रणाली अधिक सोपी आणि वेगवान करण्यावर भर दिल्याचे ते म्हणाले.
पूर्वी आयकर विभागाचे पत्र मिळण्यासाठी अनेक महिने लागायचे; मात्र आता रिटर्न प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी करप्रक्रियेतील बदलांकडे लक्ष वेधले.




