TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

युवक काँग्रेसचा मोठा संघटनात्मक निर्णय; मध्य प्रदेशातील ६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थित राहिल्याने कारवाई; काही पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणे सांगितली, तर नेतृत्वाने पूर्वकल्पना न देणाऱ्यांवरच कारवाई केल्याचे स्पष्ट केले.

भोपाळ : दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी युवक काँग्रेसने मध्य प्रदेशातील ६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये ९ जिल्हाध्यक्ष, ५ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस आणि ३२ सचिवांचा समावेश आहे. ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार हे निलंबन तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने गेल्या रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन केले होते. या सभेला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. या सभेला विरोधी पक्षांतील अनेक नेते उपस्थित होते. मात्र, मध्य प्रदेशातील युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने संघटनात्मक शिस्तीचा भंग झाल्याचे सांगत ६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, निलंबित पदाधिकाऱ्यांनी सभेला अनुपस्थित राहण्यामागे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणे असल्याचे सांगितले आहे. कारवाई करण्यापूर्वी आपल्याकडून स्पष्टीकरण मागवायला हवे होते, अशी भूमिकाही काही पदाधिकाऱ्यांनी मांडली.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मैहर जिल्हाध्यक्ष सौरभ शर्मा यांनी मोठ्या भावाला तब्बल १२ वर्षांनंतर मुलगा झाल्याने घरी कार्यक्रम असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाची माहिती आपण प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिली होती, तसेच त्यांना निमंत्रणही दिले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांपैकी आपण एक असल्याचा दावा करत, निलंबनापूर्वी कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती, असेही शर्मा म्हणाले.

हेही वाचा –  भारतीय उद्योजकावर अमेरिकेची कारवाई; इराणच्या तेल व्यापार प्रकरणात ९ कंपन्यांवर निर्बंध

युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित राजौरिया यांनी काकांचे निधन झाल्यामुळे सभेला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. याबाबत प्रदेशाध्यक्ष आणि संघटनेतील अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती दिली होती, तसेच सभेला उपस्थित राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली होती, असे त्यांनी सांगितले.

अनूपपूर जिल्हाध्यक्ष मानवेंद्र मिश्रा यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे दिल्लीला जाता आले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, याबाबत प्रदेश नेतृत्वाला पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी कबुलीही त्यांनी दिली. आमच्यात संवादाचा अभाव राहिला, असे सांगताना आपल्या संपूर्ण टीमने सभेला उपस्थिती लावली होती आणि सर्वांची तिकिटेही काढली होती, असे मिश्रा म्हणाले. आता नेतृत्वाकडे स्पष्टीकरण सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजवीर सिंह कुडिया आणि सरचिटणीस सुमन मौर्य यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभेला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. कुडिया यांनी प्रकृती अत्यंत खराब असल्याने सभेला येणे शक्य झाले नसल्याचे स्पष्ट करत याबद्दल खेद व्यक्त केला. तर सुमन मौर्य यांनी हवामानातील बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने सभेला येता आले नसल्याचे सांगितले. आजारी असल्यामुळे वरिष्ठांचे फोनही घेता आले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज सिंह यादव यांनी लहान बहिणीचे लग्न असल्यामुळे सभेला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. बहिणीचा एकुलता एक भाऊ असल्याने लग्नाची अनेक कामे आपल्यावर होती. त्यामुळे दिल्लीला जाणे शक्य झाले नाही. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून, त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे यादव म्हणाले.

दरम्यान, युवक काँग्रेसच्या मध्य प्रदेश प्रभारी शिवी सिंह चौहान यांनी निलंबनाच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पदाधिकाऱ्यांची सभेतील उपस्थिती आणि नेतृत्वाला त्यांनी आधी दिलेली माहिती, या बाबींचा विचार करून कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित पदाधिकाऱ्यांची आतापर्यंतची कामगिरी आणि संघटनेतील कामाच्या नोंदीही तपासण्यात आल्या आहेत. सभेला उपस्थित राहता येणार नसल्याची पूर्वकल्पना देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता सभेला अनुपस्थित राहिलेल्यांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group