विधानपरिषद निवडणुकीनंतर भाजपची रणनीती सक्रिय; अमित शाहांकडून रविंद्र चव्हाणांना महत्त्वाच्या सूचना
महायुतीच्या कामगिरीचा अहवाल रविंद्र चव्हाण यांनी अमित शाहांना दिल्याची माहिती; विरोधकांच्या राजकीय नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देत महायुती मजबूत ठेवण्यावर चर्चा.

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकत चांगली कामगिरी केली, तर महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि महायुतीची एकजूट कायम ठेवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महायुतीमधील अंतर्गत मतभेदांचा परिणाम काही जागांवर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी अमित शाह यांची भेट घेऊन निवडणुकीतील कामाचा अहवाल सादर केल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीदरम्यान अमित शाह यांनी महायुती अभेद्य ठेवण्यावर भर दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या राजकीय नॅरेटिव्हला योग्य प्रत्युत्तर द्या, विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर द्या आणि महायुती म्हणून पूर्ण ताकदीने भूमिका मांडा, अशा सूचना त्यांनी रविंद्र चव्हाण यांना दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – युवक काँग्रेसचा मोठा संघटनात्मक निर्णय; मध्य प्रदेशातील ६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले होते. पुणे शिक्षक मतदारसंघात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली होती. भाजपने शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला असला, तरी पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही अजित पवार गटाच्या तत्कालीन विद्यमान आमदाराला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे महायुतीच्या एकूण कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. निवडणुकीनंतर भाजपचे नवनाथ बन यांनी शिंदे गटावर टीका करत महायुतीच्या निकालाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनीही भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत अमित शाह आणि रविंद्र चव्हाण यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय वाढवणे आणि विरोधकांच्या टीकेला एकत्रितपणे उत्तर देणे, यावर भाजप नेतृत्वाचा भर असल्याचे या घडामोडींवरून दिसून येते.




