TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक महापालिकेत भाजपचे ६ स्वीकृत नगरसेवक जाहीर; रोहिणी नायडू एकमेव महिला प्रतिनिधी

नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त; अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर यांच्यासह सहा जणांची निवड

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतीय जनता पार्टीने महापालिकेसाठी सहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये रोहिणी नायडू या एकमेव महिला प्रतिनिधीला संधी देण्यात आली आहे. विविध क्षेत्रांतील व्यक्ती आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महापालिकेत काम करण्याची संधी दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

भाजपचे सहा स्वीकृत नगरसेवक कोण?

भाजपने जाहीर केलेल्या अंतिम यादीत अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांचा समावेश आहे. हे सहा जण नाशिक महापालिकेच्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून कामकाज पाहणार आहेत.

भाजपचे गटनेते श्याम बडोदे यांनी विविध क्षेत्रांतील आणि पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींना संधी दिल्याचे सांगितले. तर, भाजपमध्ये पक्षाचा आदेश अंतिम असतो आणि त्यानुसारच निर्णय घेतला जातो, असे महापौर हिमगौरी आडके यांनी स्पष्ट केले.

नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्यांना मुहूर्त

नाशिक महापालिका निवडणुकीनंतर गेल्या नऊ महिन्यांपासून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया रखडली होती. भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या गटनेत्यांनी आयुक्तांकडे आपापल्या उमेदवारांची नावे सादर केली होती.

भाजपकडून सुरुवातीला सुनील केदार, चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम घंटे, सुनील आडके, गिरीश पालवे, प्रवीण पाटील आणि डॉ. विनय मोगल यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, अंतिम यादीत सहा जणांची नावे जाहीर करण्यात आली.

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीमुळे नियुक्ती प्रक्रियेची २१ ऑक्टोबरची मुदत वाढवून ४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली होती. त्यानुसार, आज अंतिम मुदतीच्या दिवशी भाजपने आपल्या सहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली.

हेही वाचा –शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाला 05 वेळा विजेतेपद

नाशिकच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार

नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक हेमंत धात्रक यांनी शहराचा सर्वांगीण विकास आणि नाशिककरांना न्याय देण्याची भावना असल्याचे सांगितले. तसेच, शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसह शहरातील प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी म्हटले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशासकीय तयारी सुरू असताना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या कामकाजात या नव्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक

  1. अजित चव्हाण
  2. हेमंत धात्रक
  3. संदीप लेनकर
  4. रोहिणी नायडू
  5. रामहरी सभेराव
  6. चंद्रशेखर पंचाक्षरी

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group