Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत अंतिम नाही, एकनाथ शिंदेंची ग्वाही

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यापुढेही मदत करणार; कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. वाडी बु. येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण.

नांदेड : दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दिवाळीपूर्वी दिली जाणारी पाच हजार रुपयांची तातडीची मदत ही अंतिम नसून, यापुढेही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत टोकाचा विचार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना यापुढेही मदत करणार

दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत. मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचा निर्णय घेतला असून, दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत दिली जात आहे.

ही मदत अंतिम नसून पुढील काळातही शेतकऱ्यांना मदत केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वाडी बु. येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

वाडी बु. येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आजपासून नागरिकांच्या सेवेत सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या रुग्णालयात सिटी स्कॅन आणि डायलिसिस सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ५०० खाटांची सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असून, तिचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. नांदेडच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

हेही वाचा –  संभाजीनगरमध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकसह भव्य क्रीडा सुविधांचे लोकार्पण; फडणवीस म्हणाले, ‘इथून देशासाठी पदकविजेते घडतील!’

कर्करोग उपचारांसह विशेष वैद्यकीय सुविधा मिळणार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, डायलिसिस आणि अतिरिक्त खाटांची मागणी तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मेंदूविकार आणि हृदयरोग यांसारख्या आजारांसाठी विशेष तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

टाटा मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने ‘महा केअर’ उपक्रमांतर्गत नांदेडमध्ये कर्करोग उपचार सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेडसह आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांना उपचारांचा लाभ मिळू शकेल. आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत थेट पोहोचून आरोग्य सेवांची माहिती दिली जात असून, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.

५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारणार

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने श्री गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयाची ५०० खाटांची सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयामुळे नांदेड शहरासह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये कर्करोग उपचार सुविधा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुष्काळग्रस्तांसाठी मदत उपक्रमांचे उद्घाटन

कार्यक्रमादरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचे धनादेश, एकल महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थिनींना सायकलींचे वितरणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ आणि ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार बालाजी कल्याणकर यांनी रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यक्रमात सत्कार आणि स्वागत समारंभ टाळण्यात आले. थेट लोकार्पण आणि विकासकामांच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button