आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा नांदेडच्या ग्रामीण भागात दौरा; गावोगावी आरोग्य सुविधांची पाहणी, अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश
‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’ अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील पाच ठिकाणी भेटी; शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे निर्देश, दिवाळीनिमित्त शिधावाटप

नांदेड : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. आरोग्य यंत्रणेने गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सेवा द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. ‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’ अंतर्गत त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली.
या दौऱ्यात दरेगाव तांडा, वाळकेवाडी, दुधड, सरसम आणि हिमायतनगर येथील आरोग्य संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थ, रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून स्थानिक आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या.
दरेगाव तांड्यात ग्रामस्थांशी संवाद; घरोघरी आरोग्य सेवा देण्याच्या सूचना
दरेगाव तांडा येथे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गावात जाऊन ग्रामस्थांकडून दुष्काळी परिस्थिती, स्थानिक अडचणी आणि आरोग्यविषयक समस्यांची माहिती घेतली.
गावातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवकांनी पोहोचावे. नागरिकांची आवश्यक आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करावे. कोणताही नागरिक शासकीय आरोग्य सेवा आणि योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
वाळकेवाडीत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट
वाळकेवाडी येथील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिवंगत राजू ढाले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दुधड उपकेंद्र आणि सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दुधड येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन उपलब्ध सुविधा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली.
त्यानंतर सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. केंद्रात उपलब्ध असलेल्या ईसीजी तपासणी सुविधेबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेला प्राधान्य
हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्ण, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार, आवश्यक औषधे आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णसेवेत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दिवाळीनिमित्त नागरिकांना शिधावाटप
‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी, नागरिकांशी थेट संवाद आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करून प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार आणि सुविधा पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान दरेगाव तांडा आणि वाळकेवाडी येथील नागरिकांना दिवाळीनिमित्त शिधावाटपही करण्यात आले.
दौऱ्यात लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित
या पाहणी दौऱ्यावेळी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, आरोग्य सेवेचे संचालक (शहरी) डॉ. गोविंद चौधरी, संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांच्यासह स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




