Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजीनगरमध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकसह भव्य क्रीडा सुविधांचे लोकार्पण; फडणवीस म्हणाले, ‘इथून देशासाठी पदकविजेते घडतील!’

१२.७५ कोटींचा सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान, ८८ फ्लड लाईट्स आणि ४ कोटींचे युवा वसतिगृह खेळाडूंसाठी खुले; मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राला नवी चालना

छत्रपती संभाजीनगर  : विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) आणि युवा वसतिगृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘या मैदानातून देशासाठी पदकविजेते घडतील’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुंदर सिंथेटिक ट्रॅक आणि फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मैदानावर सराव करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी भविष्यात भारतासाठी पदक मिळवेल, असा आपल्याला विश्वास आहे.

या क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल समिती आणि क्रीडा विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

१२ कोटी ७५ लाखांत आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक

विभागीय क्रीडा संकुलात १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक आणि नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धांसाठी दहा लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या सुविधांमुळे धावणे, अडथळा शर्यत, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि भालाफेक अशा विविध क्रीडाप्रकारांचा सराव तसेच स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

हेही वाचा –  जैन समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; व्याजमुक्त कर्ज, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटींचे कर्जवाटप

१० हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये ८८ फ्लड लाईट्स

क्रीडा संकुलातील १० हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर प्रत्येकी २२ दिवे अशा एकूण ८८ दिव्यांची प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

फ्लड लाईट्समुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव करता येणार असून, स्पर्धांचे आयोजन करणेही शक्य होणार आहे.

चार कोटींचे युवा वसतिगृह; १६ खोल्यांची सुविधा

खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी चार कोटी रुपयांच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात १६ खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय आणि वाचन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंना सराव आणि प्रशिक्षणासोबत निवासाची सुविधाही एकाच ठिकाणी मिळणार आहे.

लोकार्पणानंतर १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा

लोकार्पण सोहळ्यानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली आणि मुलांच्या १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह आणि त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित ‘डीएफ’ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला.

नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण आणि निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनालाही यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button