शहरात ३४ एसी इलेक्ट्रिक बस धावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
जीपीएस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट आणि जलद चार्जिंगची सुविधा; आणखी १०० ई-बस सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन. चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प आणि मिटमिटा येथील शाळेचेही उद्घाटन.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यासोबतच शहरातील विविध विकासप्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात आले.
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आयोजित कार्यक्रमात बससेवेसह महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण शिलाफलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
३४ एसी इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास
महानगरपालिकेच्या शहर बससेवेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून या बस प्रवासी सेवेत दाखल होणार असून शहरातील विविध मार्गांवर त्यांचे संचालन केले जाणार आहे.
या बस नऊ मीटर लांबीच्या असून प्रत्येक बसमध्ये ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा आणि जलद चार्जिंग यांसारख्या सुविधा बसमध्ये उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बसमुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा – मिथेनॉल कंपनीवरील कारवाईला मंत्री झिरवाळांची स्थगिती? राजकीय दबावाच्या आरोपाने खळबळ
कॅनॉट गार्डन आणि बाबा पेट्रोल पंपाजवळ ईव्ही चार्जिंग स्टेशन
शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन आणि बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. या चार्जिंग स्टेशनचे लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
याशिवाय शहरात भविष्यात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा अधिक सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सिद्धार्थ उद्यानात १०० किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प
सिद्धार्थ उद्यानाच्या वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजबचतीला चालना मिळण्यासह स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
मिटमिटा येथे २४ वर्गखोल्यांची आधुनिक शाळा
महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. देवगिरी व्हॅली परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या आणि क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९.१४ लाखांची मदत
कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.
शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील या विविध प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




