दुष्काळी मदतीच्या वाटपात बार्शीची आघाडी; शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा; तांदळवाडीतील १० खातेदारांना प्रायोगिक तत्त्वावर मदत वितरणाची प्रक्रिया.

सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीचे वाटप सुरू झाले असून, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याने या प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचे संदेशही प्राप्त झाले आहेत.
या मदत वितरणासाठी शासनाने स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे आणि त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा प्रत्येक तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित मदत शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे.
दुष्काळी मदत वाटपात बार्शी तालुका आघाडीवर
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या ३०५ तालुक्यांमध्ये मदत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये बार्शी तालुक्याने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तालुक्यातील तांदळवाडी गावात प्रायोगिक तत्त्वावर १० खातेदारांना मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरल्याचा दावा करण्यात येत आहे.
ही प्रक्रिया तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांचीही यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भव्य महागंगा आरती; ६,५०० आदिवासी भाविकांचा सहभाग
महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी कामाला
प्रत्येक गावातील नियंत्रण अधिकारी तसेच ग्रामस्तरीय पंचनामा समितीतील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मदत वितरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, पोर्टलवर याद्या तयार करणे, माहितीची पडताळणी करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करणे, यासाठी महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी काम करत आहेत. दिवाळीपूर्वी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत अग्रीम मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी यासाठी बार्शी महसूल प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी सांगितले.
फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत
ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, त्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांच्या केवायसीची तपासणी करून मदतीबाबत प्रक्रिया केली जाणार आहे.
कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम कापली जाणार नाही?
दुष्काळी मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर बँका थकीत कर्जापोटी पैसे कापून घेतील, अशी भीती काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती आहे. मदतीची रक्कम बँकांनी कर्जाच्या थकबाकीसाठी कापून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश बँकांना देण्यास त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वेळेत जमा होणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




