लंडनमधून बेपत्ता झालेल्या तरुणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

पुणे | लंडन येथे एमबीएच्या उच्चशिक्षणासाठी गेलेली ३४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने निर्माण झालेल्या गूढाचा अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी शेवट झाला आहे. कुटुंबीयांच्या मते लंडनमध्ये असलेली ही तरुणी प्रत्यक्षात भारतातच पुण्यात असल्याचे उघडकीस आले, मात्र पाठोपाठ तिचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील एका फ्लॅटमध्ये आढळून आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुग्धा देशमुख (वय ३४) असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी अविनाश भास्करराव देशमुख यांनी आपली मुलगी मुग्धा बेपत्ता असल्याची तक्रार २७ ऑक्टोबर रोजी नोंदवली होती. मुग्धा जुलै २०२५ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. २३ ऑक्टोबर रोजी तिचे आईशी शेवटचे बोलणे झाले; त्यावेळी मुलाखत असल्याचे सांगून तिने घाईत फोन ठेवला. त्यानंतर २४ ऑक्टोबरपासून तिचा फोन बंद येत होता. तिच्या लंडनमधील निकिता नावाच्या मैत्रिणीशी व तेथील पोलिसांशी संपर्क साधला असता, मुग्धाने ऑगस्ट महिन्यातच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे पालकांनी तातडीने उच्चायुक्तांकडे धाव घेतली होती.
हेही वाचा
पुणे-भिवंडीतील अनधिकृत धाडी भोवल्या; FDA च्या ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी?
मुग्धाचा फोन लागत नसल्याने पालकांनी तिच्या बँक खात्याचे विवरण (स्टेटमेंट) तपासले. त्यात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, बुक माय शो, मेक माय ट्रिप आणि व्हीएफएसवरून व्यवहार झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ब्लिंकिटवरून थेट उस्मानपुरा भागातही ऑर्डर मागवल्याचे दिसल्याने ती भारतात आणि शहरात येऊनही घरी आली नसल्याचा पालकांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांत धाव घेतली.
गहुंजे येथील फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला असता तिचे लोकेशन पिंपरी-चिंचवड परिसरातील आढळले. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण बोराडे व त्यांच्या पथकाने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे भागातील ‘लोढा बेलमोंडो’ इमारतीतील संबंधित फ्लॅट गाठला. वारंवार बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्याने स्थानिक शिरगाव पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता मुग्धा मृतावस्थेत आढळून आली. या गूढ मृत्यूबाबत पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून पुढील तपास करत आहेत.




