पुणे-भिवंडीतील अनधिकृत धाडी भोवल्या; FDA च्या ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी?
एकूण २६ अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात; सहा अधिकाऱ्यांचे निलंबन, तर २० जणांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : पुणे आणि भिवंडी येथे कार्यक्षेत्राबाहेर जाऊन धाडी टाकल्याचे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. याशिवाय २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकूण २६ अधिकारी कारवाईच्या कक्षेत आले आहेत.
सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मंजुरी?
पुणे आणि भिवंडी येथे अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन धाडी टाकल्याचा ठपका FDA च्या २६ अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यापैकी सहा अधिकाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता आणखी सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पुढे आला असून, त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. त्यानंतर सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनासह अन्य २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याबाबत निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीवर धाड टाकल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि भिवंडी येथे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केली होती. ज्या तंबाखू कंपनीवर धाड टाकण्यात आली, ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असतानाही महाराष्ट्र FDA च्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीवर धाड टाकल्याने ही कारवाई अनधिकृत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
या प्रकरणाचे पडसाद न्यायालयापासून दिल्लीपर्यंत उमटल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते.
२० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार
या प्रकरणात एकूण २६ अधिकारी अडचणीत आले आहेत. त्यापैकी सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया पुढे जात असल्याची माहिती आहे, तर उर्वरित २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणातील अधिकारी पुणे आणि मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री कार्यालयातील काही अधिकारीही या प्रकरणात सहभागी आहेत का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
सुपारी प्रकरणानंतर FDA मधील आणखी मोठी कारवाई
यापूर्वी सुपारी प्रकरणातही FDA मधील जवळपास पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता २६ अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाल्याने FDA विभागातील हे मोठे प्रकरण मानले जात आहे.
एकीकडे FDA कडून हॉटेल्स आणि विविध वस्तूंवर कारवाई केली जात असताना, दुसरीकडे अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन करण्यात आलेल्या कथित अनधिकृत धाडींमुळे विभागातील वरिष्ठ अधिकारीच कारवाईच्या फेऱ्यात सापडले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. तसेच २० अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीबाबतही पुढील आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या कारवाईचे अधिकृत आदेश आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.




