३८ चेंडू, ११ षटकार अन् ११३ धावा! अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम

Abhishek Sharma | भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडत अवघ्या ३५ चेंडूंत खणखणीत शतक झळकावले. परदेशी भूमीवर कोणत्याही भारतीय फलंदाजाने नोंदवलेले हे सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठरले आहे. या ऐतिहासिक खेळीदरम्यान अभिषेकने दिग्गज विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढत अनेक नव्या विक्रमांना गवसणी घातली.
अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत ९ चौकार आणि तब्बल ११ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ११३ धावांची वादळी खेळी केली. अभिषेकने यापूर्वी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध ३० चेंडूंत शतक ठोकले होते; मात्र आता परदेशातही त्याने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने मैदानात खाली बसून ध्यानधारणेची (जप) शांत मुद्रा करत केलेले सेलिब्रेशन लक्षवेधी ठरले. अखेर १० व्या षटकात त्याच्या या झंझावाती खेळीला पूर्णविराम मिळाला.
हेही वाचा
मनोरंजन क्षेत्रावर शोककळा! ‘सीआयडी’ मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंग यांचे निधन
या वादळी खेळीसह अभिषेक शर्माच्या नावावर संपूर्ण टी-२० क्रिकेटमध्ये आता एकूण ११ शतकांची नोंद झाली असून, या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १० शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील अभिषेकचे हे चौथे शतक ठरले असून, तो आता सर्वाधिक ५ आंतरराष्ट्रीय टी-२० शतके झळकावणाऱ्या रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल यांच्या विक्रमापासून अवघे एक शतक दूर राहिला आहे.
वैभव सूर्यवंशीसोबत धावांचा पाऊस
या सामन्यात अभिषेक शर्मासोबत सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने डावातील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत दणक्यात सुरुवात केली होती. या दोघांनीही मैदानात चौफेर फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघावर प्रचंड दबाव आणला आणि प्रत्येक षटकात सरासरी १५ हून अधिक धावा कुटून संघाला तुफानी धावसंख्या उभारून दिली.




