प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

पिंपरी | पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक, चार्जर, बॅटरी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही काळाची गरज बनली आहे.या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
हेही वाचा
३८ चेंडू, ११ षटकार अन् ११३ धावा! अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम
विद्यार्थ्यांनी घरातून तसेच परिसरातून ई-कचरा संकलित करून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.‘ई-कचरा योग्य ठिकाणी, पर्यावरण सुरक्षित आपल्या हाती’ हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.ई-कचऱ्यामध्ये असलेल्या घातक घटकांमुळे माती, पाणी आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.तसेच ई-कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया (Recycling) आणि जबाबदार विल्हेवाट यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि संसाधनांचा सुयोग्य वापर करण्याची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘कचरा नव्हे, योग्य व्यवस्थापनातून संसाधन’ ही मूल्याधिष्ठित संकल्पना विद्यार्थ्यांनी आत्मसात केली. शालेय शिक्षणासोबतच पर्यावरणपूरक सवयींची जोपासना करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.शाळेच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.ई-कचरा संकलन मोहीम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविणारी आणि हरित भविष्याच्या दिशेने पाऊल टाकणारी ठरली.




