Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘५०० कोटींच्या चर्चा म्हणजे पारावरच्या गप्पा’; छगन भुजबळांचा टोला, दुष्काळाकडे लक्ष देण्याचे आवाहन

 ‘कोणी कोणाला ५०० कोटी रुपये कशाला देईल? आपापसातील कलगीतुरे थांबवा’; शेतकरी मदत, जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर भाष्य

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित देवाणघेवाणीचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी, “५०० कोटींच्या चर्चा म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत. कोण कोणाला ५०० कोटी रुपये कशाला देईल?” असा सवाल केला. कोणी कोणाला पैसे दिलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

“द्यायचे असतील तर भाजप स्वतःहून नेऊन देईल. त्यांचे मंत्री संपर्कात आहेतच ना,” असे वक्तव्यही भुजबळ यांनी केले. राजकीय नेत्यांनी आपापसातील कलगीतुरे थांबवावेत. अशा आरोप-प्रत्यारोपांमध्ये जनतेला रस नाही. कोणीही कोणाला राजकारणातून संपवू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या ताकदीनुसार राजकारणात काम करत असतो. शून्य आमदार असलेला पक्षही सुरू राहतो, असे भुजबळ म्हणाले.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

राजकीय वाद बाजूला ठेवून दुष्काळ आणि नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शेतकरी आणि शहरी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे आणि पंचनामे पूर्ण करणे ही मोठी प्रक्रिया आहे. घाईघाईने केलेल्या कामामुळे सरकारने काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून, सध्या अधिकारी बारकाईने तपासणी करत आहेत.

हेही वाचा –  कचरा टाकणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल; धर्मांतराबाबतही महत्त्वाचे निरीक्षण

हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत सरकारने पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पंचनामे आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती मदत द्यायची, याचा अंतिम निर्णय सरकार घेईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांचे कौतुक

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत भुजबळ यांनी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले. या प्रकरणात अवघ्या १५ तासांत इतर राज्यांतील पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“मी गृहमंत्री होतो, त्यामुळे पोलिसांच्या कामाची मला कल्पना आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस अतिशय कार्यक्षम आहेत. ते या प्रकरणाचा नक्कीच निपटारा करतील,” असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button