TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक! मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तासभर बंद; प्रवासाचे नियोजन करा

२६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान इगतपुरी–भरवीर मार्गावर तीन वेळा ब्लॉक; दरडप्रवण भागांत संरक्षित जाळ्या बसविण्याचे काम

मुंबई : नागपूर–मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान १२ दिवस टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. इगतपुरी आंतरबदल मार्ग ते भरवीर आंतरबदल मार्गादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.

दरडप्रवण भागांत संरक्षित जाळ्या बसविणार

नागपूर ते मुंबई असा सुमारे ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरील इगतपुरी आणि भरवीर आंतरबदल मार्गादरम्यान बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच डोंगरउतारांवरून दगड किंवा दरड कोसळण्याचा धोका आहे.

ही बाब लक्षात घेऊन अशा संवेदनशील ठिकाणी संरक्षित जाळ्या बसविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या कामाला सुरुवात करण्यात आली असून, ते पूर्ण करण्यासाठी २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा –  नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; ‘कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करा, दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा’

दिवसातून तीन वेळा वाहतूक बंद

महामार्ग पोलिसांच्या परवानगीनुसार, या कालावधीत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर दररोज तीन वेळा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यानुसार सकाळी १० ते ११, दुपारी १ ते २ आणि दुपारी ४ ते ५ या वेळेत इगतपुरी आंतरबदल मार्ग ते भरवीर आंतरबदल मार्गादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

प्रत्येक ब्लॉकदरम्यान संबंधित मार्गिकेवरील वाहतूक एका तासासाठी बंद राहणार आहे. मात्र, ब्लॉकच्या वेळा वगळता इतर वेळेत या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.

७ नोव्हेंबरपासून वाहतूक सुरळीत

संरक्षित जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ७ नोव्हेंबरपासून इगतपुरी ते भरवीर आंतरबदल मार्गादरम्यानची वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी ब्लॉकच्या वेळा लक्षात घ्याव्यात आणि संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button