दसरा मेळाव्यात शिंदेसेनेचा मोठा बदल; सांस्कृतिक कार्यक्रम रद्द, थेट भाषणावर भर!
शिंदे गटाचा नेस्को सेंटरमध्ये मेळावा; उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावर एल्गार, महाराष्ट्रातील दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष

मुंबई : दसऱ्यानिमित्त मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दसरा मेळावे दरवर्षी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतात. या मेळाव्यांमधून दोन्ही पक्ष आपली राजकीय भूमिका मांडतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांकडे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, यंदा शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्याच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल केला आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. यंदा या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नसल्याची माहिती आहे. दरवर्षी मेळाव्यात सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स आयोजित केले जातात. मात्र, यंदा हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
यंदाच्या मेळाव्यात थेट भाषणांवर भर दिला जाणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासांत मेळावा संपवण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मदत पोहोचवली जाणार आहे. गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती, तर यंदा दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – गोकुळ निवडणुकीत महाडिकांना मोठा धक्का! शौमिका महाडिकांचा अवघ्या ७ मतांनी पराभव; फेरमतमोजणीची मागणी
उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावर एल्गार
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाकडून विशेष पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘हुकूमशाहीला दणका देण्यासाठी, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी… चला, एल्गार करूया!’ असा संदेश या पोस्टरवर देण्यात आला आहे. तसेच दसरा मेळावा २०२६, स्थळ – शिवतीर्थ, दादर, असा उल्लेख करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यंदाच्या मेळाव्यात कोणती राजकीय भूमिका मांडणार आणि सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवरून निशाणा साधणार, याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्यांना किती शिवसैनिक उपस्थित राहतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात दसरा मेळाव्यांची परंपरा
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जातात. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा होतो. यावेळी सरसंघचालकांचे संबोधन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.
मराठवाड्यातही दसऱ्यानिमित्त दोन महत्त्वाचे मेळावे होतात. मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा नारायणगडावर, तर पंकजा मुंडे यांचा मेळावा भगवानगडावर आयोजित केला जातो.
त्यामुळे यंदा मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांसह नागपूर आणि मराठवाड्यातील मेळाव्यांमध्ये कोणते राजकीय संदेश दिले जातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




