गोकुळ निवडणुकीत महाडिकांना मोठा धक्का! शौमिका महाडिकांचा अवघ्या ७ मतांनी पराभव; फेरमतमोजणीची मागणी
सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सरशी; महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना, गोकुळच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. महाडिक कुटुंबातील आणि गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांचा राजू आवळे यांनी अवघ्या सात मतांनी पराभव केल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर शौमिका महाडिक यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील अंतिम चित्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून शौमिका अमल महाडिक निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसप्रणित सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे राजू जयवंतराव आवळे मैदानात होते. या चुरशीच्या लढतीत आवळे यांनी सात मतांनी विजय मिळवल्याचे वृत्त आहे.
गोकुळ दूध संघावर गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने महायुतीसमोर कडवे आव्हान उभे केले. या निकालामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹५ हजारांची मदत? फडणवीसांच्या घोषणेचा कोणाला मिळणार लाभ?
कोण आहेत शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे, तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून त्या जिल्हा परिषद सदस्यही होत्या. तसेच, त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मागील निवडणुकीत ४३ मतांनी विजय
२०२२ मधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी महाडिक गटाकडून निवडणूक लढवत ४३ मतांनी विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत त्यांची सतेज पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्याशी चुरस झाली होती. त्यावेळी शौमिका महाडिक पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक म्हणून निवडून आल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत मात्र सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शौमिका महाडिक यांच्या सात मतांच्या पराभवामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी मागणी केलेल्या फेरमतमोजणीनंतर अंतिम निकालात काही बदल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




