‘माझ्या मुलांनी IAS अधिकारी होऊ नये!’ तुकाराम मुंढेंचा स्पष्ट सल्ला; मुलांनी राजकारणी किंवा उद्योजक व्हावं, असं का वाटतं?
२१ वर्षांत २५ बदल्या; प्रशासकीय सेवेतील दबाव आणि कुटुंबाला करावा लागलेला त्याग सांगत मुंढेंनी व्यक्त केली इच्छा

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या शिस्तप्रिय आणि कडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. ते ज्या विभागात कार्यरत होतात, तिथे त्यांच्या कामाची चर्चा रंगते. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या कारवाईमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, याच तुकाराम मुंढे यांनी आपल्या मुलांनी प्रशासकीय सेवेत येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याऐवजी त्यांनी राजकारणी किंवा उद्योजक व्हावे, असे आपल्याला वाटते, असे मुंढे यांनी एका मुलाखतीत सांगितले.
‘मुलांना सांगेन, प्रशासकीय अधिकारी बनू नका’
पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलांनी प्रशासकीय सेवेत जावे, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
“भविष्यात माझी मुलं पुढारी किंवा उद्योजक व्हावीत, असं मला वाटतं. त्यांनी राजकारण किंवा व्यापारात रमावं, असा मी त्यांना सल्ला देईन,” असे मुंढे म्हणाले. त्यांच्या मते, आजच्या तरुणांनी अशी क्षेत्रे निवडली पाहिजेत, जिथे प्रशासकीय बंधनांशिवाय आणि कोणत्याही दबावाखाली न राहता समाजासाठी काम करता येईल.
“माझ्या मुलांनी मला विचारलं की, त्यांनी प्रशासकीय अधिकारी व्हावं का, तर मी त्यांना थेट सांगेन, अजिबात बनू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण आणि उद्योगातूनही करता येते जनसेवा
तरुण पिढीकडे अमर्याद ऊर्जा आणि ज्ञान आहे. त्यामुळे त्यांची क्षमता प्रशासकीय चौकटीत अडकून राहू नये, असे मुंढे यांचे मत आहे. राजकारण आणि उद्योग ही दोन्ही क्षेत्रे समाजाच्या विकासात योगदान देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. या क्षेत्रांमध्ये काम करताना अधिक स्वातंत्र्य मिळू शकते आणि जनतेसाठी विविध प्रकारे काम करता येते, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे आपल्या मुलांनी केवळ प्रशासकीय सेवेकडे करिअर म्हणून पाहण्याऐवजी इतर क्षेत्रांचाही विचार करावा, अशी त्यांची भूमिका आहे.
हेही वाचा – दसरा मेळाव्यात शिंदेसेनेचा मोठा बदल; सांस्कृतिक कार्यक्रम रद्द, थेट भाषणावर भर!
२१ वर्षांत २५ बदल्या; कुटुंबालाही सोसावा लागला त्रास
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत वारंवार झालेल्या बदल्यांचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम झाला. २१ वर्षांच्या सेवेत त्यांच्या २५ बदल्या झाल्याचे सांगितले जाते. या बदल्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मुंढे यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा पाचवीत जाईपर्यंत त्याला सहा वेळा शाळा बदलावी लागली. सततच्या बदल्यांमुळे त्यांच्या पत्नीलाही त्रास सहन करावा लागला. जनसेवेचा हा कठीण मार्ग आपण स्वतः निवडला होता आणि त्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची आपली तयारी होती; मात्र, या प्रवासात कुटुंबीयांनाही मोठा त्याग करावा लागला, असे त्यांनी नमूद केले.
मुलांनी वेगळा मार्ग निवडावा, हीच इच्छा
प्रशासकीय सेवेत काम करताना येणारे दबाव, वारंवार होणाऱ्या बदल्या आणि कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा अनुभव घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. मुलांनी उद्योजक किंवा लोकनेते व्हावे आणि समाजासाठी स्वतंत्रपणे काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे.
प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रशासकीय सेवाच एकमेव मार्ग नाही, तर राजकारण आणि उद्योगातूनही समाजहित साधता येते, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून मिळतो.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




