महाराष्ट्रातील सरकारी ऑनलाइन सेवा आजपासून बंद; दाखले, प्रमाणपत्रांसाठीच्या कामांना ब्रेक!
महाआयटीच्या डेटा सेंटर स्थलांतरामुळे १६ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजल्यापासून सेवा तात्पुरत्या बंद; २० ऑक्टोबरला पूर्ववत होण्याची अपेक्षा

मुंबई : शासकीय दाखले, विविध प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज आणि अन्य सरकारी कामे करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या (महाआयटी) प्रणाली अद्ययावतीकरण आणि डेटा सेंटर स्थलांतराच्या कामामुळे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवा आज, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून तात्पुरत्या बंद राहणार आहेत. या सेवा मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ऑनलाइन शासकीय कामांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची काही दिवस गैरसोय होऊ शकते.
संकेतस्थळे, पोर्टल्स आणि ॲप्स राहणार बंद
महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेली आणि देखभाल केली जाणारी विविध शासकीय संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स तसेच नागरिक आणि सामाईक सेवा केंद्रचालकांसाठीच्या (व्हीएलई) सेवा या कालावधीत अनुपलब्ध राहतील. त्यामुळे संबंधित पोर्टल्सवरून अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे किंवा अन्य ऑनलाइन व्यवहार करणे शक्य होणार नाही.
कोणत्या विभागांच्या नेमक्या कोणत्या सेवा प्रभावित होतील, याची सेवावार माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आपल्या कामासाठी संबंधित विभागाकडून खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा – स्मार्टवॉच हृदयविकाराचा धोका ओळखू शकते? अलर्टकडे दुर्लक्ष नको, पण निदानही समजू नका!
तांत्रिक सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी काम
राज्य शासनाच्या डिजिटल सेवांची कार्यक्षमता वाढवणे, तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक स्थिर करणे आणि ऑनलाइन सेवा सुरक्षित व विश्वासार्ह बनवणे, या उद्देशाने प्रणाली अद्ययावतीकरण आणि डेटा सेंटर स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोमवार, १९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा महाआयटीचा प्रयत्न आहे. त्यानंतर तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यावर २० ऑक्टोबर रोजी सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
नागरिकांनी तातडीचे ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रलंबित व्यवहार आज दुपारी ४ वाजण्यापूर्वी पूर्ण करावेत, असे आवाहन महाआयटीने केले आहे. अर्ज सादर केल्यानंतर पावती मिळाल्याची खात्री करावी. पुढील काही दिवसांत अर्जाची मुदत संपत असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधून पर्यायी व्यवस्था किंवा मुदतवाढीबाबत माहिती घ्यावी.
नियोजित तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल महाआयटीने दिलगिरी व्यक्त केली आहे. नागरिकांनी सेवा पुन्हा सुरू झाल्याची खात्री करूनच प्रलंबित ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा.




