विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा भेटीस स्पष्ट नकार!

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित घोळाविरोधात राजधानी दिल्लीत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर आता ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने थेट आक्रमक पवित्रा घेतला असून, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) विरोधकांचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघणार आहे. मात्र, या मोर्चापूर्वीच सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी विरोधकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एका ई-मेलद्वारे त्यांनी भेटीस नकार देण्यामागची घटनात्मक कारणे स्पष्ट केल्याचे वृत्त समोर आले आहे.
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दोन घटनात्मक संस्थांमधील कार्यक्षेत्राच्या विभागणीचा (Separation of Powers) मुद्दा विरोधकांच्या निदर्शनास आणून दिला आहे. प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयांत कार्यकारी मंडळाच्या दैनंदिन कामकाजात सर्वोच्च न्यायालय थेट हस्तक्षेप करू शकत नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
सीजेपी आंदोलनानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; शिवतीर्थावर मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक
त्याच वेळी, विरोधकांना कायदेशीर मार्ग सुचवताना सरन्यायाधीशांनी नमूद केले की, या मुद्द्यावर काँग्रेस किंवा विरोधकांनी न्यायालयात रीतसर याचिका दाखल करावी; त्यावर मंगळवारी तातडीने सुनावणी घेता येऊ शकेल. ज्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे, त्यांच्यासाठी देशाचे सर्वोच्च न्यायालय २४ तास खुले आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राहुल गांधींचे देशव्यापी आवाहन
दुसऱ्या बाजूला, राहुल गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि तरुण वर्गाला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कथित ‘व्होट चोरी’ रोखण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि निवडणूक आयोगाची ‘स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रिया तात्काळ थांबवावी, या मुख्य मागण्यांसाठी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. सरन्यायाधीशांच्या भेटीस नकार मिळाल्यानंतर आता विरोधक मोर्चाबाबत काय रणनीती आखतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.




