Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीजेपी आंदोलनानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; शिवतीर्थावर मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम; दादरमध्ये मनसेचे आंदोलन, तर ठाकरे सेनेकडून दडपशाहीविरोधात मूक आंदोलन

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांना शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रविवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर ही बैठक होत असल्याने मनसेच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी ११ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होऊन स्वाक्षऱ्या कराव्यात, असे आवाहन पक्षाकडून करण्यात येणार आहे.

सीजेपी आंदोलनावेळी ठाकरे बंधूंचा हस्तक्षेप

दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पोलिसांच्या वाहनाला अडविल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडून दिले.

या घटनेनंतर मनसेकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी, “सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांनी येऊन सह्या कराव्यात, हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर दसऱ्यापर्यंत काय काय करू, हे कळेल,” असे सांगितले.

हेही वाचा –  तुकाराम मुंढे चौकशी समितीच्या सचिवपदी, अध्यक्ष विवेक भीमनवारांचा रजेवर जाण्याचा निर्णय

दादरमध्ये दोन आंदोलनांची तयारी

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात आज दोन स्वतंत्र आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून कथित दडपशाहीविरोधात मूक आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे सेनेकडून करण्यात आले आहे. सीजेपी आंदोलनानंतर मनसेची भूमिका आणि ठाकरे बंधूंचा सहभाग यामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर टीका

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळली गेली असून, त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप सीजेपी, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

निवडणूक आयोगातील अन्य दोन आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयावरील चर्चा अधिक तीव्र झाली. या दाव्यांबाबत संबंधित अधिकृत नोंदी आणि स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदार सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाबाहेर आंदोलन केले होते.

आता मुंबईत मनसेची स्वाक्षरी मोहीम, ठाकरे सेनेचे मूक आंदोलन आणि राज ठाकरे यांनी बोलावलेली तातडीची बैठक यामुळे पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे. स्वाक्षरी मोहिमेनंतर मनसे कोणती भूमिका घेणार आणि आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल, हे बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button