TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार पक्षात दाखल; स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंचा भाजप प्रवेश

‘विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश’; दोन्ही मतदारसंघ जिंकण्याचा कौस्तुभ गावडेंचा विश्वास

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. 

‘उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षासोबत राहणे ही शिस्त’

पक्षप्रवेशावेळी रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारीच्या मुद्द्यावर पक्षातील इच्छुकांना संदेश दिला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी पक्षासोबत राहणे ही पक्षाची शिस्त असल्याचे ते म्हणाले.

शरद लाड यांनी या निवडणुकीसाठी तयारी केली होती, त्याचा आपण साक्षीदार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र निवडणुकीला आता कमी कालावधी राहिला असून अवघ्या १५ दिवसांत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असेही चव्हाण म्हणाले.

हेही वाचा –  MPSC आंदोलनावर नितेश राणेंचे विद्यार्थ्यांना आवाहन; ‘रोहित पवारांनी चर्चेची भूमिका घ्यावी, आपण एकत्रित काम करू’

‘विकसित भारताचे स्वप्न भाजप पूर्ण करू शकते’

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. “विकसित भारताचे स्वप्न भाजप पूर्ण करू शकते. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेशाची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार,” असे त्या म्हणाल्या.

विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान असावे, या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाधव यांनी सांगितले. “मला काम करण्याची संधी मिळेल. कोल्हापूर माझी जन्मभूमी आणि पुणे माझी कर्मभूमी आहे. पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

‘दोन्ही मतदारसंघ खेचून आणू’

पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनीही पक्षनेतृत्वाचे आभार मानले. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून प्रेरणा घेऊन आपण गेल्या सहा वर्षांपासून भाजपमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“मी पाच जिल्हे पिंजून काढले आहेत. माझ्यावर जबाबदारी टाकल्याबद्दल नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार. पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ आम्ही खेचून आणू,” असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपने पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर या तीन मतदारसंघांसाठी अनुक्रमे डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे आणि सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button