ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरी आल्यानंतरची पहिली 30 मिनिटे तुमचे भविष्य ठरवू शकतात! – प्रा. विजय नवले

पिंपरी : नुकतेच एका विद्यार्थ्याचे करिअर कौन्सिलिंग करत असताना त्याच्या अभ्यासातील कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आले. बोलता बोलता त्याने प्रामाणिकपणे सांगितले की त्याचा मोबाईलवर साधारण पाच तास वेळ जातो. मी त्याला एक अगदी साधा प्रश्न विचारला—

“कॉलेजमधून घरी आल्यानंतर तू सर्वप्रथम काय करतोस?”

त्याचे उत्तर ऐकल्यानंतर मला जाणवले की हा प्रश्न केवळ त्या एका विद्यार्थ्याचा नाही. आज अनेक घरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात असे चित्र पाहायला मिळते.

विद्यार्थी कॉलेजमधून घरी येतो. शूज काढतो आणि कॉलेजचेच कपडे अंगावर असताना सोफ्यावर किंवा बेडवर पडतो. हात-पाय-तोंड धुणे नाही, कपडे बदलणे नाही, बॅग जागेवर ठेवणे नाही, डबा बाहेर काढणे नाही. हातात मोबाईल येतो आणि “फक्त थोडा वेळ” म्हणून सुरू झालेली स्क्रीनची सफर कधी एक तास, कधी दोन तास चालते. आणि विशेष म्हणजे दिवसभर मोबाईल पाहिलेलाच असतो!

सिग्नलवर मोबाईल, बसमध्ये मोबाईल, कॉलेजच्या ब्रेकमध्ये मोबाईल, कॅन्टीनमध्ये मोबाईल, जेवताना मोबाईल आणि घरी आल्यानंतर पुन्हा मोबाईल!

मला मोबाईलला विरोध करायचा नाही. मोबाईल हे उत्तम साधन आहे; पण साधनाने आपल्याला नियंत्रित करण्याऐवजी आपण साधनाला नियंत्रित केले पाहिजे.

मी त्या विद्यार्थ्याला म्हटले, “घरी आल्यानंतरचा क्रम बदलून बघ.”

घरी आलात की आधी शूज-सॉक्स व्यवस्थित ठेवा. बाहेरचे कपडे बदला. धुण्याचे असतील तर धुण्यासाठी ठेवा; पुन्हा वापरण्याचे असतील तर नीट जागेवर ठेवा. हात-पाय-तोंड धुवा. घरातले स्वच्छ आणि आरामदायी कपडे घाला. बॅगेतील टिफिन बॉक्स लगेच बाहेर काढून स्वयंपाकघरात ठेवा. बॅग तिच्या ठरलेल्या जागेवर ठेवा.

ही छोटी कामे वाटतात; पण यालाच शिस्त म्हणतात.

यानंतर थोडा आराम करा. भूक लागली असेल तर काहीतरी खा. गरज असेल तर थोडा वेळ मोबाईल पाहा. शक्य असल्यास दहा-पंधरा मिनिटे चालून या. शरीर आणि मन फ्रेश करा. आणि त्यानंतर दिवसातील महत्त्वाच्या कामांकडे वळा—आज कॉलेजमध्ये काय शिकवले? उद्याचे काय करायचे आहे? कोणती Assignment बाकी आहे? कोणता अभ्यास पूर्ण करायचा आहे? कोणत्या विषयाचे Revision आवश्यक आहे?

हेही वाचा –  पीसीयू मधील उच्च सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे – हर्षवर्धन पाटील

हा साधा क्रम आयुष्यात मोठा फरक निर्माण करू शकतो.

कारण यश केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते; ते आपल्या रोजच्या सवयींवरही अवलंबून असते.

दुसऱ्या बाजूचे चित्र पाहा. बॅग तशीच पडलेली आहे. कालचा डबा दुसऱ्या दिवशी सकाळी आई डबा भरायला गेल्यावर बॅगेतून निघतो. Assignment कधी द्यायची हे माहीत नाही. Homework बाकी आहे. नोट्स अपूर्ण आहेत. खोली अस्ताव्यस्त आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि सकाळी उठताना कंटाळा.

हळूहळू ही केवळ अभ्यासाची समस्या राहत नाही; ती जीवनशैली बनते.

आणि मला पालकांनीही एक गोष्ट समजून घ्यावी असे वाटते. अनेक पालकांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला. शिक्षण घेतले, नोकरी-व्यवसायात कष्ट केले, काटकसर केली आणि मुलांसाठी चांगले घर, चांगले शिक्षण, चांगला मोबाईल, वाहन, सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुलांना आपण भोगलेल्या अडचणी येऊ नयेत ही त्यामागची स्वाभाविक भावना आहे.

पण सुविधा देताना संघर्ष करण्याची सवयच हरवणार नाही ना, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अर्थात, आजची सगळीच मुले अशी आहेत असे अजिबात नाही. आजही अनेक विद्यार्थी अतिशय शिस्तबद्ध आहेत. ते मोबाईल वापरतात; पण मर्यादेत. अभ्यास करतात, व्यायाम करतात, स्पर्धा-परीक्षांची तयारी करतात, नवीन कौशल्ये शिकतात, प्रोजेक्ट करतात, वाचन करतात आणि आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात.

म्हणून प्रश्न “आजची पिढी कशी आहे?” हा नाही.

खरा प्रश्न आहे—

“माझ्या सवयी कशा आहेत?”

तुम्ही विद्यार्थी असाल तर स्वतःला आजच विचारा:

कॉलेजमधून घरी आल्यानंतरचा माझा पहिला एक तास कसा जातो?
मी मोबाईल वापरतो की मोबाईल मला वापरतो?
माझी बॅग, पुस्तके, कपडे, खोली आणि वेळ यामध्ये शिस्त आहे का?
दिवस संपताना मी माझ्या ध्येयाच्या दिशेने काहीतरी केलेले असते का?

कारण करिअर अचानक घडत नाही. करिअर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून घडत असते.

तरुण वय फक्त Entertainment, Enjoyment, Timepass आणि सतत स्क्रीनमध्ये घालवण्याचा काळ नाही. हेच वय स्वतःला घडवण्याचे आहे. शिक्षण, कौशल्ये, फिटनेस, संवादकौशल्य, वाचन, अनुभव, ध्येय आणि शिस्त यांची पायाभरणी करण्याचे आहे.

आजची स्पर्धा प्रचंड आहे. त्यामुळे क्षमता असूनही बेशिस्त जीवनशैली, सततचा विलंब आणि अनियंत्रित मोबाईल वापर यामुळे विद्यार्थी स्वतःच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही.

म्हणून माझा विद्यार्थ्यांना एक साधा संदेश आहे—

मोठे भविष्य घडवायचे असेल, तर आधी छोट्या सवयी व्यवस्थित करा.आणि पालकांना आपल्या मुलामध्ये अशा सवयी सातत्याने जाणवत असतील—अति मोबाईल वापर, कामे पुढे ढकलणे, अभ्यासात सातत्य नसणे, ध्येयाचा अभाव, अस्ताव्यस्त दिनक्रम किंवा स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष—तर केवळ ओरडून किंवा मोबाईल हिसकावून घेऊन प्रश्न सुटेलच असे नाही. त्या सवयीमागचे कारण समजून घेऊन योग्य दिनक्रम, स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण कृती आणि नियमित Review यावर काम करणे आवश्यक आहे.

अशा विद्यार्थ्यांच्या Study Habits, Mobile Discipline, Daily Routine, Goal Setting आणि Performance Improvement यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कृती आराखडा तयार करता येऊ शकतो.

लक्षात ठेवा—
शिस्त म्हणजे बंधन नव्हे;
शिस्त म्हणजे आपल्या भविष्यासाठी आज घेतलेली जबाबदारी!

— © प्रा. विजय नवले
Career Mentor | Counsellor | Trainer
9822502969

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button