वर्तणूक, देहबोली आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नोकरी, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होता येते – डॉ. धनंजय मंडलिक

चिंचवड : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’ चे उद्घाटन चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नोकरीसाठी जळगांव , अमरावती , अहिल्या नगर, संभाजी नगर , मंचर , चाकण , सातारा , कोल्हापूर , पुणे , लोणावळा , तळेगांव , कल्याण व पिंपरी चिंचवड परिसरातील उमेदवार उपस्थित होते .
विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय मंडलिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फुगे सोडून या भव्य जॉब फेअर २०२६ चे उद्घाटन करण्यात आले.
या रोजगार संदर्भात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा ग्रुपचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा होते. व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालक डॉ. तेजल शहा, विश्वस्त शैलेश शहा, तळेगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा अमृता कुलकर्णी, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी-मुलतानी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा , खजीनदार डॉ. भूपाली शहा , संचालक डॉ. तेजल शहा यांच्या हस्ते करण्यात आले .
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. धनंजय मंडलिक म्हणाले, “या जॉब फेअरमध्ये ९२ कंपन्यांनी सहभाग घेतला आणि ४५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व आज ५००० जणानी उपस्थिती दर्शविली ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. राज्य सरकार देखील यांची दखल घेईल असा विश्वास व्यक्त केला. नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुसती पदवी घेणे महत्त्वाचे नसून त्याला आवश्यक असलेले इतर पूरक कौशल्य आत्मसात केलेले असणे महत्त्वाचे आहे. त्याला आपल्या आई वडील व शिक्षकाच्या संस्काराची जोड असणेही गरजेचे आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण कसे बोलतो , आपली देहबोली आणि वर्तणूक कशी आहे हे खूप महत्त्वाचे आहे.आजच्या जॉब फेअर मध्ये सगळ्यांनाच नोकरी मिळेल असे नाही, परंतु आज मिळालेल्या संधीचे सोने करा. झालेल्या चुकांची दुरुस्ती करून कोठे कमी पडतो ते लक्षात घ्या. ज्याना यश मिळणार नाही त्याना तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावे. उमेदवारानी देखील आत्मविश्वासाने पुढील मुलाखतीला सामोरे जावा. कर्तृत्ववान असाल तर नोकरी नक्कीच मिळेल . भविष्यात “उत्तम आयुष्य जगण्यासाठी स्वतःला सक्षम करा. असे आवाहन करून चाणक्यनितीचे दाखले यावेळी उपस्थितांना दिले .
हेही वाचा – वाशू भगनानी लंडनमधील रुग्णालयात दाखल; आयकर विभागाच्या कारवाईनंतर प्रकृतीची चर्चा
विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, “पदवीधर युवकांच्या हाती काम व योग्य संधी वेळीच मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. काहींना नोकरी मिळेल तर काहींना मिळणार नाही, परंतु कंपन्यांबरोबर नोकरीसाठी संपर्क होणे हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रतिभा महाविद्याल्याने नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेगळे उपक्रम राबवले आहेत.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक डॉ. दीपक शहा म्हणाले, “प्रतिभा महाविद्यालयाचा यावेळी हा अकरावा जॉब फेअर असून आजपर्यंत बी.कॉम, बी. एड. बी.बी.ए., बी.सी.ए.,बी.एस्सी, एम.कॉम, एम.बी.ए., एम.सी.ए., एम.एस्सी, बी.ई., बी.टेक., एम.ई., एम.टेक. आदी क्षेत्रात शैक्षणिक पात्रता असलेल्या आमच्या व इतर महाविद्यालयातील पाच हजाराहून अधिक उमेदवारांना आयोजीत केलेल्या गेल्या दहा जॉब फेअर माध्यमातून आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या अकराव्या जॉब फेअर २०२६ मध्ये उपस्थित उमेदवाराना मोठया प्रामाणात नोकऱ्या मिळतील. हे संस्थेच्या सामुहिक प्रयत्न व अथक परीश्रमातूनच शक्य झाले आहे . उपस्थितांना डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले ,नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, पगार किती मिळणार हे महत्वाचे नसून मिळणारी संधी ही तुमच्या कौशल्यावर अवलंबून असते. मुलाखतीत अपयश आले तरी खचून जावू नका . मुलाखतीमधून झालेल्या चूकांची दुरूस्ती करून , आपण कोठे कमी पडलो हे लक्षात घ्या .आत्मविश्वासाने पुढील मुलाखतीला सामोरे जावा. तूमच्यात कतृत्व असेल तर नक्कीच नोकरी मिळेल. उत्तम आयुष्य जगण्यासाठी स्वतःला सक्षम करा .आव्हानाना सामोरे जावा. लक्षात ठेवा कष्ट हे करावेच लागेल, आलेल्या प्रत्येक संकटाना सामोरे जात त्यावर मात करायला शिका . काही वर्ष नोकरी करून अचूक अनुभव प्राप्त करून भविष्यात स्वःताचा व्यवसाय सुरू करून इतराना नोकरी देणारे व्यावसायीक बना. स्वतःचे व आपल्या आई वडीलांची स्वप्न पूर्ण करा असा कानमंत्र देवून शुभेच्छा दिल्या.
जॉब फेअरला भेट दिलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थितांना म्हणाले, “पुरेसे ज्ञानाबरोबर चांगला संवाद साधता आला पाहिजे. समूहात काम करताना ‘मी’ पणा असता कामा नये. उद्भवणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता अंगी असली पाहिजे.
यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा व संचालक डॉ. तेजल शहा यांच्या हस्ते विविध कंपन्याचे संचालक, उद्योग समुहातील मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी , विभाग अधिकारी, समवेत महाविद्यालयातील डॉ. हर्षिता वाच्छाणी, डॉ. हनुमंता कोळी, डॉ. गुरुराज डांगरे, सायली आमले, अंशूम वर्मा, वहीदा पठाण, डॉ . मनीष पाटणकर यांचा भेट वस्तू देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले. तर आभार प्रचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांनी मानले . जॉब फेअर २०२६ यशस्वी करण्यासाठी प्राचार्या , प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले





