शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीपूर्वी मदत देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितली तारीख
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; युद्धपातळीवर पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे सरकारचे आश्वासन

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने २६ सप्टेंबर २०२६ रोजी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांसाठी विविध दुष्काळी सवलती आणि मदत उपाययोजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयानुसार या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मात्र, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार, मदत सरसकट मिळणार का आणि त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
‘दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करू’
दत्तात्रय भरणे म्हणाले की, यंदा पावसाची कमतरता आणि दीर्घ पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विविध भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे भरणे यांनी सांगितले.
“राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ज्या सवलती आणि मदतीच्या उपाययोजना करता येतील, त्या केल्या जातील. पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना सुट्टी न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे भरणे यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी “लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली जाईल. अगदी तारीख सांगायची म्हटली तर दिवाळीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांना मदत करू,” असे सांगितले.
हेही वाचा – जमीन खरेदी-विक्रीसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य; फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
सरसकट मदत मिळणार? फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
२६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून १२ तातडीच्या उपाययोजनांना मान्यता देण्यात आली आहे. Trigger-1 अंतर्गत दुष्काळ घोषित करण्यात आला असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांमध्ये जमीन महसुलात सवलत, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा, अन्नधान्याची उपलब्धता आणि चाऱ्याची व्यवस्था यांचा समावेश आहे.
इतर तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश होणार?
दुष्काळी यादीत आपल्या तालुक्याचा समावेश झाला नसल्याच्या तक्रारी काही भागांतून येत आहेत. यावरही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे.
ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याच्या तक्रारी आहेत, तेथे पाहणी करून आवश्यकतेनुसार पुढील टप्प्यात त्यांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान, २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





