चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने; आधुनिक मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन सेवेत
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण; संवेदनशील भागांवर २४ तास निगराणी, आपत्कालीन प्रतिसादाला मिळणार गती

चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिशीलता आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनदेखील पोलिसांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. या व्हॅनच्या माध्यमातून संवेदनशील भाग, महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रभावी निगराणी ठेवणे शक्य होणार आहे.
फिरत्या सीसीटीव्ही व्हॅनमधून संवेदनशील भागांवर नजर
मोर्चे, सण-उत्सव, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनचा उपयोग केला जाणार आहे. व्हॅनवर ३६० अंश फिरणारे उच्च क्षमतेचे PTZ, हाय-डेफिनिशन आणि नाईट-व्हिजन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री लांब अंतरावरील परिसरातील हालचालींचे स्पष्ट चित्रण करता येणार आहे.
नियंत्रण कक्षाशी थेट जोडणी
या व्हॅनमधील कॅमेरे मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे घटनास्थळावरील परिस्थितीचे थेट निरीक्षण करणे पोलिसांना शक्य होणार आहे. वाहनांमध्ये आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग व स्टोरेज व्यवस्था तसेच सार्वजनिक घोषणा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन सूचना आणि तातडीने निर्णय घेण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
एखादी अनुचित घटना घडल्यास घटनास्थळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून संबंधित पोलीस पथकांना तातडीने सूचना देणे आणि आवश्यक प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करणे अधिक सुलभ होणार आहे.
गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला गती
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या नवीन वाहनांमुळे पोलिसांच्या नियमित गस्तीला गती मिळणार असून, घटनास्थळी तातडीने पोहोचण्याची क्षमता वाढणार आहे. आधुनिक वाहनांसोबत तंत्रज्ञानाधारित निगराणी व्यवस्था उपलब्ध झाल्याने ‘सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे.
कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी केले.




