Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा अधिक व्यापक करा; गणेश मंडळांना पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन

धुळे शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी; सामाजिक विषयांवरील देखावे, सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक

धुळे : सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी जनजागृती आणि समाजप्रबोधनाच्या चळवळीचे स्वरूप दिले. हीच परंपरा पुढे नेत धुळे शहरातील गणेश मंडळांनी श्रद्धा आणि उत्सवासोबतच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचे कार्य अधिक व्यापक करावे. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा देणारा लोकोत्सव आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी धुळे शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि गणेशभक्तांशी संवाद साधत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विविध मंडळांनी उभारलेले सजीव देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजप्रबोधनपर उपक्रमांची पाहणी करून त्यांनी कलाकार व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

यावेळी महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे तसेच मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केवळ धार्मिक उत्सव म्हणून नव्हे, तर लोकजागृती आणि समाजाला संघटित करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून केली. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून धुळ्यातील अनेक गणेश मंडळे वर्षानुवर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रम राबवत आहेत. संवेदनशील सामाजिक विषयांवर सजीव देखावे सादर करून नागरिकांना विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे काम मंडळांकडून होत आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एका मंडळाने सादर केलेल्या सजीव देखाव्यातील बालकलाकारांचे कौतुक करताना रावल यांनी त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. लहान मुलांनी अत्यंत प्रभावीपणे भूमिका साकारल्या असून, त्यामागे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू एकता मित्र मंडळाने गेल्या ४७ वर्षांपासून विविध संवेदनशील सामाजिक विषयांवर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीची परंपरा जपल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा –  चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने; आधुनिक मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन सेवेत

जय श्री कृष्ण मित्र मंडळाच्या कार्याचेही कौतुक

जय श्री कृष्ण मित्र मंडळाच्या कार्याचा उल्लेख करताना पालकमंत्र्यांनी मंडळाचे भिकन वराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून धुळ्याची ओळख खानदेशासह महाराष्ट्रभर पोहोचली आहे. यंदा काही तांत्रिक कारणांमुळे अपेक्षित स्वरूपात आयोजन करता आले नसले, तरी पुढील वर्षी अधिक व्यापक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने आयोजन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवातील मोठ्या लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही व्हावा, असे रावल यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद २०२६’ या उपक्रमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात ‘लोकसंवाद’ चित्ररथाच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जात असून, गणेश मंडळांनी या अभियानाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून डिजिटल जतन करण्याचे आवाहन

“गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, लोकसहभाग आणि लोककल्याणाचा प्रभावी मंच ठरला पाहिजे. आपल्या गणेशोत्सवातील समृद्ध परंपरांचे ‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून डिजिटल जतन करूया आणि ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवूया,” असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

समाजातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट होऊन चांगल्या विचारांचा विजय व्हावा, धुळे शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गणरायाचे पाठबळ मिळावे आणि समाजहिताची कामे करण्यासाठी सर्वांना सामर्थ्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री गणरायाच्या चरणी केली. भाविकांच्या मनातील चांगल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा सदिच्छा व्यक्त करून त्यांनी धुळेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री रावल यांनी हिंदू एकता मित्र मंडळ, राजवाडे बँक समोर लालबाग मित्र मंडळ, गल्ली नं. ७ जय श्री कृष्ण मित्र मंडळ, गल्ली नं. ४ मरिमाता मित्र मंडळ, क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ, गणराज प्रतिष्ठान मित्र मंडळ, जय झुलेलाल मित्र मंडळ, जय श्री कृष्ण मित्र मंडळ, वंदे मातरम् ग्रुप आणि प्रिन्स ग्रुप या गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक कलाकार, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button