ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

Anant Nag | भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांची चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (PIB) बुधवारी अधिकृतरीत्या या पुरस्काराची घोषणा केली.
अनंत नाग यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत मनःपूर्वक अभिनंदन केले. “दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अनेक दशकांपासून त्यांच्या सहज अभिनयाने, अष्टपैलूत्वाने आणि उत्कृष्ट कामगिरीने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड सिनेसृष्टीवर खोलवर प्रभाव पाडला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक दुर्मिळ खोली आणि अस्सलपणा जाणवला. एका खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कलाकारासाठी हा अत्यंत योग्य सन्मान आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या अभिनय प्रवासाचा गौरव केला.
हेही वाचा
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सहा दशकांची कारकीर्द आणि ३०० हून अधिक चित्रपट
४ सप्टेंबर १९४८ रोजी जन्मलेल्या अनंत नाग (नागरकट्टे) यांनी १९६७ मध्ये आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. गेल्या सहा दशकांत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या, ज्यामध्ये २५० हून अधिक कन्नड चित्रपटांचा समावेश आहे. कन्नडव्यतिरिक्त त्यांनी हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली. आर. के. नारायण यांच्या साहित्यावर आधारित गाजलेल्या ‘मालगुडी डेज’ या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. त्यांना कारकिर्दीत पाच वेळा ‘कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला असून, २०२५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी सन्मानानेही गौरविले आहे.





